फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरुन भाजपची शिवसेनेला नोटीस


मुंबई: कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात शुक्रवारी भाजपच्या वत्तीने राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी या आंदोलनाआधी देवेंद्र फडणवीस यांनी मेकअप केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांचा तसा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. आता त्या फोटोवरुन आक्रमक झालेल्या भाजपने शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. भाजपने या प्रकरणी नागपूरमध्ये पोलीस तक्रारदेखील दाखल केली आहे.

एक मेकअप मॅन व्हायरल झालेल्या फोटोमध्ये फडणवीस यांचा मेकअप करताना दिसत आहे. फडणवीस यांनी काळी पँट, पांढरा शर्ट आणि त्यावर निळे जॅकेट परिधान केले आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलनादरम्यान हेच कपडे परिधान केले होते. राज्यातील कोरोना संकट हाताळण्यात ठाकरे सरकारला अपयश आल्याची टीका आंदोलनादरम्यान फडणवीस यांनी केली. मेकअप करून फडणवीस आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी व्हायरल झालेला फोटो बदनामी करणारा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ शिवसेनेच्या मुंबईतील टीमने व्हायरल केल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलन करतानासुद्ध मेकअप मॅन सोबत, आता बोला आंदोलन होते की फोटो शूट? ही लोक महाराष्ट्र वाचवणार, अशा आशयासह फडणवीसांचा फोटो व्हायरल झाला.

शिवसेनेला लोढा यांनी त्यांचे वकील हितेश जैन यांच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. व्हायरल करण्यात आलेला फडणवीस यांचा फोटो बराच जुना आहे. ते मुख्यमंत्री असताना नागपूरमधील रामगिरी बंगल्यावर फोटो काढण्यात आला होता, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. मी २२ मे रोजी झालेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनादरम्यान फडणवीस यांच्यासोबत हजर होतो. तिथे असा कोणताही प्रकार (मेकअप) झाला नसल्याचे लोढा म्हणाले.

Leave a Comment