एका चूकीमुळे जगासमोर उघड झाले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक तपशील


वॉशिग्टंन – कोरोना व्हायरसमुळे चीनवर वारंवार आगपाखड केल्यामुळे चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्याचे झाले असे की व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींच्या एका चूकीमुळे सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी बँक खात्याचे तपशील समजले.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याला अमेरिकाही अपवाद ठरलेली नाही. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अशा सगळ्या वातावरणात व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी बँक खात्याचे तपशील सगळ्या जगासमोर सांगितले. कोरोनासंबंधीची माहिती देताना व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकनेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक तपशीलच सांगून टाकले असून त्यांच्याकडून ही चूक अनावधानाने झाली.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काय काय कामे केली? काय निर्णय घेतले ते व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव केली मॅकनेनी या पत्रकारांना सांगत होत्या. काही दस्तावेज त्यावेळी दाखवताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्सही सांगून टाकले आणि यामुळे जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक तपशील समजले. केली मॅकनेनी १ लाख डॉलरचा चेक दाखवत होत्या. त्याचवेळी त्यांनी पत्रकारांना ट्रम्प यांच्या खासगी खात्याची माहितीही दाखवून टाकली. या संदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे तीन महिन्यांचे वेतन कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाला दिले आहे. एक लाख डॉलरचा चेक यासंदर्भातच साईन करण्यात आला होता. हा चेक दाखवताना केली मॅकेनिन यांनी ट्रम्प यांच्या खात्याची माहितीही देऊन टाकली. ट्रम्प सरकारच्या एका अधिकाऱ्याने या सगळ्या प्रकारानंतर सर्व राग पत्रकारांवरच काढला. आपले तीन महिन्यांचे वेतन ट्रम्प हे कोरोनाशी लढण्यासाठी देत आहेत. ही बातमी महत्त्वाची आहे यापेक्षा त्यांचे बँक तपशील सगळ्यांना समजले यालाच महत्त्व दिले जाते आहे या गोष्टीला काय अर्थ आहे का? असाही प्रश्न या अधिकाऱ्याने विचारला.

Leave a Comment