मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत या स्थानावर, पाकिस्तान, नेपाळपेक्षाही मागे

भारतात टेलिकॉम कंपन्या आपल्या इंटरनेट स्पीडबाबत भलेही मोठमोठे दावे करत असले तरी मात्र सत्य वेगळे आहे. भारतात मोबाईल ब्रॉडबँड स्पीडची स्थिती पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही खराब आहे. मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत तीन स्थानांनी घसरून 132 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

उकला स्पीड टेस्ट एप्रिल 2020 च्या आकड्यांनुसार, भारतात मोबाईल ब्रॉडबँडचा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 9.81Mbps आणि सरासरी अपलोड स्पीड 3.98Mbps आहे. उकला दर महिन्याला मोबाईल ब्रॉडबँडच्या स्पीडबाबत जवळपास 139 देशांची यादी जाहीर करत असते.

उकलाने एप्रिल 2020 मध्ये मोबाईल ब्रॉडबँड स्पीडबाबत 139 देशांची यादी जाहीर केली असून, यात भारत 132 व्या स्थानावर आहे. या यादीत पाकिस्तान 112 आणि नेपाळ 111, श्रीलंका 115 आणि बांगलादेश 130 व्या स्थानावर आहे.

जगभरात मोबाईल ब्रॉडबँडचा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 30.89Mbps आणि अपलोडिंग स्पीड 10.50Mbps आहे. रिपोर्टनुसार, सर्वाधिक इंटरनेट स्पीड 88.01Mbps दक्षिण कोरिया या यादीत पहिल्या स्थानावर आहे. यानंतर कतार, चीन, यूएई आणि नेदरलँड या देशांचा समावेश आहे.

Leave a Comment