हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला कायमस्वरुपी राम राम


मुंबई – सक्रिय राजकारणाला कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कायमस्वरुपी राम राम ठोकत निवृत्ती घेतली आहे. आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून केली आहे. त्याचबरोबर पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडीओत सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले होते. हर्षवर्धन जाधव हे राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे चर्चेत होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे हर्षवर्धन जाधव हे जावई आहेत.

निवृत्ती जाहीर करताना हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले की, लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून राजकारणातून निवृत्ती घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे.

वाद हे प्रत्येक घरात होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. संजना जाधव यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. संजना जाधव या रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. त्यामुळे आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला होता. दोन वेळा आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता.

Leave a Comment