कोरोना इफेक्ट : या कंपनीने बनविला शवपेटीत बदलणारा बेड

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या आकडेवारीत वाढ होत चालली आहे. इक्वाडोरच्या ग्वायाकिल शहरात मृतांचे प्रमाण वाढल्याने, येथे लोकांना शवपेटीची समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणून एका कोलंबियाच्या कंपनीने खास बेड तयार केले आहे. या बेडचे शवपेटीत रुपांतर करता येते.

एबीसी डिस्प्लेस नावाच्या कंपनीने हा खास बेड तयार केला आहे. ही मूळ मार्केटिंगची कंपनी आहे. मात्र आता कंपनीने कार्डबोर्ड बेड-शवपेटी तयार केली आहे. कंपनीचे रोडाल्फो गोमेझ यांनी सांगितले की, इक्वाडोरमध्ये काय झाले ते आपण सर्वांनी पाहिले. येथे नातेवाईक मृत व्यक्तीचे शव रस्त्याने घेऊन जात होते. महामारीमुळे अंत्यसंस्कार प्रणाली देखील कोलमडली आहे. त्यामुळे आम्ही शवपेटीमध्ये बदलता येणारे बेड तयार करण्यास सुरूवात केली.

या बेड्सला धातूच्या पट्ट्या, चाके आहेत व हे बेड वर-खाली देखील करता येते. हे बेड 150 किलो वजन सांभाळू शकते. या बेड-शवपेटीची किंमत जवळपास 92 ते 132 डॉलर (जवळपास 7 ते 10 हजार रुपये) आहे.

व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच बेडचे शवपेटीमध्ये रुपांतर करता येईल. बगोटा येथील फॅक्टरीमध्ये महिन्याला अशा 3 हजार बेड्सची निर्मिती केली जाणार आहे. हे खास बेड सर्वात प्रथम लेटिसिया येथील एका हॉस्पिटलला दान केले जाणार आहे. गोमेझ यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात पेरू, चिली, ब्राझील, मॅक्सिको आणि अमेरिकेतील खरीददारांशी बोलणी देखील सुरू केली आहे.

Leave a Comment