नवऱ्याला मोदींच्या बैठकीत येऊ दिले नाही म्हणून नुसरत जहाँ झाली नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रशासकीय बैठकीत पतीला प्रवेश न दिल्याने तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ या नाराज झाल्या आहेत. पतीला प्रवेश न दिल्याने बैठकीत सहभागी न होताच नुसरत जहाँ या परतल्याची माहिती समोर आली आहे. नुसरत यांना बैठकीत जाण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र त्यांना पतीला देखील सोबत घेऊन जायचे होते.

अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी कोलकत्तामध्ये दाखल झाले होते. त्यांनी राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत हवाई पाहणी केली. यानंतर मोदींनी बसीरहाट कॉलेजमध्ये एक उच्चस्तरीय बैठक केली.

खासदार नुसरत जहाँ या देखील बैठकीत सहभागी होण्यासाठी कॉलेज परिसरात पोहचल्या होत्या. त्यांच्या सोबत पती निखिल जैन आणि अन्य दोन सहाय्यक होते. त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यापासून रोखण्यात आले. मात्र त्यांना स्थानिक खासदार असल्याचे सांगितल्यावर त्यांना प्रवेशास परवानगी मिळाली. मात्र त्यांच्या पतींना आl जाण्यास मनाई करण्यात आली. यावरून नुसरत जहाँ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर नाराज झाल्या. पती निखिल जैन यांना आत येऊ न दिल्याने त्या देखील रागाने परतल्या.

Leave a Comment