विलनकुलम येथील विशेष शनी मंदिर

फोटो साभार लर्न रिलीजन

२२ मे रोजी देशभर शनी जयंती साजरी झाली. तामिळनाडूतील तंजावर जवळ विलनकुलम अक्षयपुरीश्वर मंदिर एका खास कारणाने प्रसिध्द आहे. हे मंदिर शिव पार्वतीला समर्पित आहे मात्र शनीने येथे केलेल्या उपासनेमुळे ते निर्माण झाले आहे. या ठिकाणी शारीरिक अपंगत्व असलेले, साडेसातीचा त्रास सुरु असलेले भाविक विशेष पूजा करतात. येथे शिवपार्वतीबरोबरच भाविक शनिदेवाची त्याच्या पत्नी मंदा आणि जेष्ठा यांच्यासह पूजा करतात.

या मंदिराची कहाणी अशी सांगतात, विलम या तमिळ शब्दाचा अर्थ आहे बेल किंवा बिल्व आणि कुलम म्हणजे गर्दी. म्हणजे एकेकाळी येथे बेलाची खूप झाडे होती. शनीदेवाचा पाय बेलाच्या मुळात अडकला आणि मोडला आणि त्याला पंगुत्व आले. तेव्हा त्याने हा रोग दूर व्हावा म्हणून शंकराची तपस्या केली. प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला पंगुत्व दूर होईल आणि विवाह होईल असा वर दिला. तेव्हापासून येथे पंगुत्व असलेले आणि साडेसाती असलेले भाविक आवर्जून पूजा करण्य्हासाठी येतात.

हे मंदिर ७०० वर्षे जुने असून तमिळ शैलीत बांधले गेले आहे.चोल राजा पंद्यान याने १३३५ ते १३६५ या काळात हे मंदिर उभारले. मंदिराला विशाल प्रांगण, छोटे मंडप आहेत. आतील सर्वात महत्वाचा मंडप सर्व बाजूनी भिंतींनी घेरलेला असून तेथे आत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. येथेच गर्भगृह असून आत मोठे शिवलिंग आहे. येथे फक्त पुजारी जाऊ शकतात.

शनीची पूजा येथे विशेष पद्धतीने केली जाते. शनी हा ८ आकड्याचा स्वामी आहे. त्यामुळे येथे ८ वेळा आठ वस्तूंसह पूजा केली जाते. भाविक आठ उलट आणि आठ सुलट प्रदक्षिणा घालतात.

Leave a Comment