आता पोस्टातूनही करू शकता ट्रेनचे आगाऊ आरक्षण


मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. पण या लॉकडाऊनमुळे देशभरातील विविध राज्यात अनेक परप्रांतिय मजूर अडकून पडले आहेत. आता त्या मजूरांनी मिळेल त्या साधनाने आपआपल्या राज्यात पोहचण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यातच केंद्र सरकारने अशा मजूरांसाठी 1 मेपासून विशेष श्रमिक गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता पर्यंत लाखो स्थलांरित मजूरांना आपआपल्या राज्यात सुखरुप पोहचवण्यात आले आहे. त्यातच आता रेल्वे मंत्रालयाने देशभरात १ जून पासून २०० पॅसेंजर रेल्वे चालवण्यात येणार असल्याची घोषणा केल्यामुळे या मजूरांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यातच आता नियमबद्ध पद्धतीने आरक्षण तिकीट सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने शुक्रवारी घेतला आहे.

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार रेल्वे आजपासून तिकीट एजंटच्या माध्यमातून सामान्य सेवा केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमधून तिकीट आरक्षणाची परवानगी देणार आहे. म्हणजेच आरक्षित प्रवासासाठी प्रवासी स्टेशन, रेल्वे परिसरांतील काऊंटरवरून तिकीटांची बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, यावेळेस सोशल डिस्टन्सिंग राखले जाण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्येही आरक्षित तिकीटांचे बुकिंग आणि कॅन्सलेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तर रेल्वे तिकीट आयआरसीटीसीचे अधिकृत एजंटही बुकिंग करू शकतील.

याबाबत माहिती देताना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, रेल्वेच्या तिकीटांचे बुकिंग देशातील तब्बल १.७ लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्यामुळे ज्यांच्याकडे कम्प्युटर तसेच इंटरनेट नाही आहे त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर ग्रामीण आणि दूरस्थ स्थानांवर सरकारच्या ई सेवा उपलब्ध करून देणारे सेंटर आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील रेल्वे सेवा २५ मार्चपासून बंद आहे. एक मे पासून श्रमिक स्पेश ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. तर १ जून पासून नव्या २०० रेल्वे चालवल्या जाणार आहेत. हे सेंटर अशा ठिकाणी असतात ज्या ठिकाणी कम्प्युटर तसेच इंटरनेटची सोय नसते. पुढे असेही सांगण्यात आले की दोन तीन दिवसांत काही स्थानकांवर काऊंटरवरही बुकिंग सुरू केले जाईल.

Leave a Comment