आमच्या नादी लागू नका; निलेश राणेंचा रोहित पवारांना इशारा


मुंबई : भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपने पुकारलेल्या माझे अंगण, माझे रणांगण, महाराष्ट्र बचाव या आंदोलनात सहभाग नोंदवला. राणे बंधूंनी यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

रोहित पवार यांच्याविरोधात सुरु असलेल्या ट्विटर वॉरवर देखील यावेळी निलेश राणे यांनी भाष्य केले. मुंबईतील ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझे काय करणार आहे. आमच्या नादी लागू नका, हे घरी बसून फक्त फेसबुक लाईव्ह करु शकतात, असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला. त्याचबरोबर शिवसेनेवर टीका करताना निलेश राणे म्हणाले की, शिवसेना फक्त हॅशटॅग आंदोलन करु शकते. कारण ते बोटे दाबण्यात पटाईत आहेत. आज त्यांना लोक शिव्या घालत आहेत. हॅशटॅग करुन लोकांची मने जिंकता येत नाहीत. यासंदर्भातील वृत्त टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिले आहे.


निलेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत सुरु असलेल्या ट्विटरवॉर बद्दलही भाष्य केले. सुरु झालेले हे ट्विटर वॉर थांबवायचे की नाही त्यांचा विषय. साखरेबद्दल मी बोललो, पवार साहेबांचे नाव देखील मी घेतले नाही. ते आदरणीय आहेत आणि राहतील. पण माझा प्रश्न साखर उद्योगावर करोडो रुपये उडवले गेले त्याला प्रतिसाद काय? साखर उद्योगावरचा नफा-तोटा महाराष्ट्राने कधी विचारायचा नाही? त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर किती होतो हे विचारायचे नाही? आणि हे विचारले तर त्या रोहित पवारला त्रास झाला? कारण तो स्वतः एक-दोन कारखाने चालवतो. आयते पैसे मिळतात. ते कुणाला कळायला नको म्हणून त्याने सुरुवात केली, मी नाही केली, असे निलेश राणे म्हणाले.


त्याचबरोबर वैयक्तिक दुष्मनी करण्यात मला रस नाही आणि त्याची तेवढी कुवतही नाही. विषय होता साखरेचा. या उद्योगाचा महाराष्ट्राला किती फायदा झाला? आधी त्यांनी भाषा काय वापरली ते बघा! आमच्या नादी लागू नका नाही तर अजून फाडून खाईन. मुंबईतील ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझे काय करणार आहे. आमच्या नादी लागू नका, हे घरी बसून फक्त फेसबुक लाईव्ह करु शकतात, असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला. मला ज्या शब्दात बोलले त्या शब्दात त्यांना सुनावणे हे माझे काम आहे आणि मी ते करणार. माझ्याविरोधात कुठे तरी तक्रार केली आहे. पण मला अजून कुठली नोटीस आलेली नाही, असे स्पष्टीकरण निलेश राणे यांनी दिले.


दरम्यान आमदार नितेश राणे म्हणाले, आज शासन दिसत नसल्यामुळे आंदोलन करणे भाग होते, कारण राज्यातील रुग्ण संख्या वाढत आहे, त्यावर नियंत्रण नाही. मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह सोडून कुठे दिसत नाहीत. अन्य राज्यांचे मुख्यमंत्री हॉस्पिटल, आयसोलेशन वॉर्ड येथे दिसतात. कोरोना संकटानंतर पुढे आर्थिक संकट आहे. आपला महाराष्ट्र दिशाहीन आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक घाबरल्या परिस्थितीत आहे. म्हणून लोकांना कळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

राज्यात रुग्ण वाढत आहेत, पण आकडे लपवले जात आहेत. मुख्यमंत्री क्वारंटाईन आणि जनता व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णांना बेड नाही. खासगी हॉस्पिटल लूट करीत आहेत. सरकार फसवत असल्यामुळे आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आज आमच्या अंगणात उभे राहून सर्वसामान्यांचा आवाज नोंदवत असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

Leave a Comment