भाजपच्या नवनिर्वाचित आमदाराने उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा


बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जमाव गोळा केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे नवनिर्वाचित भाजपचे आमदार रमेश कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे आता रमेश कराड हे अडचणीत आल्याचे दिसत आहे. कराड आणि त्यांच्या 22 सहकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसताना गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे रमेश कराड यांनी दर्शन घेतले. त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारुन जमाव केला आणि त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कराड यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्यामुळे अधिकाऱ्यांचा आदेश उल्लंघन केल्याचा आरोप कराड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान कराड हे नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले आहेत. भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला होता. भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र अचानक त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली.

Leave a Comment