मोदींच्या 1 हजार कोटींच्या तुटपुंज्या मदतीवर ममता बॅनर्जींची टीका


कोलकोता – अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली. त्याचबरोबर यावर त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर नुकसानग्रस्तांना १ हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली. ममता बॅनर्जी त्यांच्या या मदतीवर कमालीच्या संतप्त झाल्या आणि जोरदार टीका केली आहे.

ममता यांनी मोदी यांच्या या घोषणेवर पश्चिम बंगालचे १ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत केवळ १ हजार कोटी देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याला या घोषणेमधील कोणतीही माहिती दिलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर मदतीची ही रक्कम कधी मिळेल, ही रक्कम सुरुवातीची आहे का, याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. पश्चिम बंगालचे अम्फान वादळामुळे १ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. उलट केंद्राकडे आमचेच ५३ हजार कोटी रुपये थकलेले असल्याची टीका ममता यांनी केली.

दरम्यान, राज्यात चक्रीवादळामुळे ८० मृत्यू झाल्याचे ममता यांनी सांगितले. तसेच गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मोदी यांनी यानुसार लगेचच ट्विट करत शुक्रवारी येत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आज पश्चिम बंगालचा दौरा केला.

त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी प्रयत्न केले. तरीही ८० जणांना आम्ही वाचवू शकलो नाही. याचे दु:ख आहे. या चक्रीवादळामुळे शेती, वीज आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आता आम्हाला त्यांची मदत करायची आहे. दोन्ही सरकारे मिळून मदत करणार असल्याचे मोदी म्हणाले.

Leave a Comment