‘महाराष्ट्र सायबर सेल’कडून मॉन्ट ब्लँक नावाच्या नकली वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन


मुंबई : मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली संकेतस्थळासंदर्भात सध्या आर्थिक फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत असून महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने या नकली वेबसाईटपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


बरेच सायबर भामटे सध्या लॉकडाऊनच्या काळात खोटे मेसेजेस व फेक वेबसाईट बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या बरेच मेसेजेस व पोस्ट व्हायरल होत आहेत. या कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर विशेषतः त्यांच्या शाई पेन या उत्पादनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात सूट दिली आहे व सर्वांनी त्यांच्या वेबसाईटवरून त्यांची उत्पादने विकत घ्यावीत. महाराष्ट्र सायबर सेल सर्व नागरिकांना विनंती करते की जर तुम्हाला अशा कोणत्या प्रकारचा मेसेज आला व खालील पैकी कोणत्याही वेबसाईटचे नाव त्या मेसजमध्ये दिसल्यास त्यावर क्लिक करू नये. कारण त्या वेबसाईट या सायबर भामट्यांनी लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याकरिता बनविलेल्या फेक वेबसाईट आहेत.

फेक वेबसाईटची नावे
https://montblancindia.co
https://montblancsindia.com
https://montblancindias.com
https://montblancindia.org
https://montblancindia.co

Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अधिकृत विक्रेते हे टाटा क्लिक (Tata Cliq) आहेत व त्यांची वेबसाईट https://luxury.tatacliq.com/ अशी आहे. त्यामुळे जर कोणत्याही नागरिकांनी वरीलपैकी कोणत्याही फेक वेबसाईटवर खरेदी केली असेल व त्यांना डुप्लिकेट वस्तू किंवा अजून खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी मिळाली नसेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार द्यावी व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील त्याची नोंद करावी. असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे दाखल झाले असून २१३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

Leave a Comment