अमेरिकन कंपनी रिलायन्स जिओत करणार ११ हजार ३६५ कोटींची गुंतवणूक


मुंबई – अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी केकेआरने ११ हजार ३६७ कोटी रूपयांची मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून या गुंतवणुकीबद्दलची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओने दिली. ११ हजार ३६५ कोटी रूपयांची गुंतवणूक करून जिओमधील २.३२ टक्के हिस्सा केकेआर खरेदी करणार आहे.

रिलायन्स जिओ सारख्या आशियाई कंपनीत केकेआरने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी रूपये तर एन्टरप्राईझ व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे. या गुंतवणुकीसोबतच रिलायन्स जिओमध्ये महिनाभराच्या कालावधीत ७८ हजार ५६२ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. महिन्याभरात रिलायन्स जिओमध्ये करण्यात आलेली ही पाचवी गुंतवणूक आहे.

रिलायन्स जिओमध्ये यापूर्वी न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकने ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती. जनरल अटलांटिक याअंतर्गत जिओ प्लॅटफॉर्ममधील १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. जनरल अटलांटिकची आशियाई कंपनीतील ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

तत्पूर्वी सर्वात आधी रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकने ५,६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.

या गुतंवणूकीवर प्रतिक्रिया देताना रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी भारतीय डिजिटल इको प्रणालीत बदल करण्याच्या आमच्या प्रवासात केकेआर आमच्या सोबत असेल. हे सर्व भारतीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महत्त्वपूर्ण भागीदार होण्याचा केकेआरचा ट्रॅक रेकॉर्ड विलक्षण आहे. केकेआरचे जागतिक व्यासपीठ, उद्योगांची माहिती आणि परिचालनाचे कौशल्य जिओच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरेल, असे म्हटले आहे.

देशातील ठराविक कंपन्यांकडे डिजिटल इको प्रणाली बदलण्याची क्षमता असते. त्यापैकीच एक जिओ हे आहे. जिओ एक असा स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे, जो सध्या भारतात डिजिटल क्रांती घडवत आहे. जिओचे जागतिक स्तरावरील इनोव्हेशन आणि उत्तम नेतृत्वामुळेच आम्ही कंपनीत गुंतवणूक करत असल्याची माहिती केकेआरचे सहसंस्थापक हेनरी क्राविस यांनी दिली.

Leave a Comment