डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगवरुन चीनला भरला दम


वॉशिग्टंग – हाँगकाँगमध्ये मागील लोकशाही हक्कांसाठी मोठे आंदोलन झाल्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाद्वारे हाँगकाँगसाठी नवा कायदा आणण्याची तयारी चीन करत आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्तावित कायदा प्रत्यक्षात येण्याआधीच चीनला चांगलाच दम भरला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

ट्रम्प यांनी चीनला इशारा देताना हाँगकाँगवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर अमेरिकेकडून अत्यंत कठोर प्रतिक्रिया उमटू शकतात, असे म्हटले आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हाँगकाँगची स्वायत्तता आणि मानवी हक्कांचा आदर राखणे अत्यंत महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

हाँगकाँग हे जागतिक स्तरावरील सर्वात मोठे आणि महत्वाचे वित्तीय केंद्र असून १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली हाँगकाँग आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत. तेथील जनता लोकशाही हक्कांसाठी जागरुक असल्यामुळे हाँगकाँगमध्ये चीनचे सर्व कायदे लागू होत नाहीत. मागच्यावर्षी हाँगकाँगमध्ये लोकशाही हक्कांसाठी हिंसक आंदोलन झाले होते.

आता चीनने तेथील कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा एकदा हिंसक आंदोलन होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनला आपला नंबर १ शत्रू बनवले आहे. चीनमुळेच कोरोना व्हायरस जगभरात पसरला. त्यामुळे सातत्याने ट्रम्प चीनला लक्ष्य करत आहेत. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षीय निवडणूक होणार आहे. त्याआधी प्रत्येक आघाडीवर चीनची कोंडी करण्याची ट्रम्प यांची रणनिती आहे.

Leave a Comment