मुले पालकांशी वारंवार खोटे बोलतात का?


कधी आईबाबांच्या रागाला, ओरड्याला सामोरे जावे लागू नये म्हणून, तर कधी मित्र-मैत्रिणींच्या विचारसरणीचा त्यांच्यावर परिणाम झाला असल्याने, आपल्या लहान मोठ्या चुका लपविण्यासाठी लहान मुले खोटे बोलण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आईवडिलांची किंवा इतरांची फसवणूक करण्याचा जाणीवपूवर्क हेतू यामागे नसतो, कारण लहान मुलांचे मन तितक्या पातळीला जाऊन क्वचितच विचार करू शकते. पण स्वतःची चूक लपविण्यासाठी, किंवा केलेल्या चुकीच्या परिणामांची भीती मनामध्ये असल्याने मुले कधी कधी खोट्याचा आधार घेताना दिसतात. सुरुवातीला लहान सहान गोष्टींसाठी खोटे बोलत असताना, नकळत ही सवय कधी जडते हे मुलांना देखील उमजत नाही. पालकांच्या लक्षात ही गोष्ट यायला लागते, तेव्हा जर त्यावेळी संवेदनशीलपणे ही परिस्थिती हाताळली गेली नाही, तर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे खोटे बोलण्याच्या सवयीपासून मुलांना दूर करायचे असल्यास काही गोष्टी लक्षात घेणे पालकांसाठी आवश्यक आहे.

खोटे बोलण्याची सवय मुलांना जन्मजात येत नाही. आपल्या आसपासच्या मंडळींना खोटे बोलताना पाहूनच मुलांना ही सवय जडते. कित्येकदा पालकांना देखील, मुले लहान सहान गोष्टींच्या बाबतीत खोटे बोलताना पाहत असतात. घरामध्ये पालक असताना देखील मुलांना आपण घरामध्ये नाही असे सांगावयास सांगणे, ही बाब पालकांच्या लेखी फारशी गंभीर नसली, तरी हा मुलांच्या लेखी खोटेपणाच आहे. अश्या लहान सहान घटना पाहून मुलांना, खोटेपणाचे वर्तन सर्वमान्य आहे असे वाटण्याचा संभव असतो. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर खोटे बोलणे, वागणे टाळायला हवे.

मुलांचे खोटे पकडले गेल्यानंतर काही वेळा पालकांच्या रागाचा उद्रेक होतो. रागापायी पालक मुलांना बोलतात, क्वचित प्रसंगी मुलांवर हात ही उचलतात. पण यामुळे मुले सुधारण्याऐवजी मुलांच्या मनामध्ये आणखीनच भीती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर मुलांच्या हातून कोणतीही चूक घडली असेल, तर त्याची कबुली देताना मुलांना भीती वाटू नये असे वातावरण आणि पालक-मुलांचे परस्परसंबंध असावेत. मुलांचा खोटेपणा लक्षात आल्यावर पालाकंनी मुलांशी संवाद साधून खोटेपणामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मुलांना योग्य मार्गदर्शन करावे.

मुलांनी आपली चूक मोकळेपणाने कबुल केली तर त्यांच्यावर न रागावता मोठ्या मानाने त्यांना क्षमा करावी. पालकांनी मुलांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्यावी आणि चूक सुधारण्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करावे. जर मुलांनी चुकीची कबुली दिल्यानंतर पालक त्यांच्यावर रागावले, तर पुढच्या वेळी मुले चुकीची कबुली देण्याऐवजी खोटे बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील. मुलांची चूक आणि त्याबद्दल त्यांनी दिलेली कबुली, त्याबद्दल त्यांच्या भावना समजून घ्याव्या. त्यामुळे मुले मनाने आपल्या पालकांच्या आणखी जवळ येतील.

Leave a Comment