इंदूरच्या या 95 वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला असला तरी, या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. इंदुरमधील 95 वर्षीय आजी कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये 11 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. यासोबतच त्यांचा देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोव्हिड-19 चे संक्रमण झाल्यानंतर 95 वर्षीय आजींना शहारातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये 10 मे ला भरती करण्यात आले होते. उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना 21 मे ला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. या आजींना गुडघे दुखीची समस्या असल्याने चालताना त्रास होतो. त्यांच्या 70 वर्षीय मुलाचे काही दिवसांपुर्वीच निधन झाले आहे. मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली.

महिलेच्या नातेवाईक दीपा यांनी सांगितले की, त्यांच्या 70 वर्षीय मुलाचे 4 मे ला निधन झाले. त्यांना ताप, सर्दी-खोकला असे लक्षण होते. त्यांची अचानक तब्येत बिघडली व त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर आम्ही स्वतः आधिकाऱ्यांशी संपर्क साधत कुटुंबातील 16 लोकांची टेस्टिंग केली. या टेस्टमध्ये 95 वर्षीय महिलेसह 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

त्यांनी सांगितले की, मागील 4 दिवसात महिलेसह 5 जण बरे होऊन घरी आले असून एकावर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment