वाराणसी पासून उज्जैन पर्यंत आहे या देवीचे महात्म्य

 

फोटो साभार जस्ट डायल

भारतात देवी उपासकांची संख्या खूप मोठी असून देशात असंख्य देवी मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे विविध चमत्कारांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. पण एक वेगळाच चमत्कार असलेले मंदिर उज्जैन, भोपाळ आणि वाराणसी अश्या तीन ठिकाणी आहे. हरसिद्धी माता असे या देवीला म्हटले जाते. तिचे चरण म्हणजे पाय  वाराणसी येथे, धड भोपाळ मध्ये तरावली येथे तर मस्तक उज्जैन येथे आहे. विक्रमादित्य राजाशी या देवीचा संबंध आहे.

भोपाळ येथील या देवीच्या मंदिरात भाविक त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून उलटी प्रदक्षिणा घालतात आणि मनोकामना पूर्ण झाली की पुन्हा येऊन सुलट प्रदक्षिणा घालतात. नवरात्रात या तिन्ही मंदिरात मोठी गर्दी होते.

अशी कथा सांगतात की, राजा विक्रमादित्य वाराणसी येथे गेलेल्या एका मुलाला सोडवून आणण्यासाठी तेथे गेला होता तेव्हा काशी नरेशाने मुलाच्या बदली येथील देवीची सेवा कर असे त्याला सांगितले. विक्रमादित्याने तेथे तपस्या केली तेव्हा देवीने त्याला दर्शन दिले आणि त्याची इच्छा विचारली. तेव्हा त्याने देवीला त्याच्यासोबत उज्जैन येथे येण्याची विनंती केली. देवी तयार झाली पण तिने तिचे पाय वाराणसी येथेच राहतील आणि प्रवासात जेथे पहाट होईल तेथच ती राहील अशी अट घातली. राजाने ती मान्य केली. प्रवासात भोपाळ तरावली जवळ पहाट झाली तेव्हा देवी तेथे स्थिरावली.

मग विक्रमादित्याने तेथेही १२ वर्षे तप केले आणि देवीला प्रसन्न करून घेतले आणि उज्जैन येथे येण्याची विनंती केली तेव्हा देवीने तिचे मस्तक उज्जैन येथे येईल असे सांगितले. तरावली मंदिरात तेव्हापासून एक धुनी आजही प्रज्वलित असून त्यातील निखारा घेऊन देवीची आरती केली जाते. उज्जैन येथील मंदिरात ५१ फुट उंचीच्या दोन प्रचंड दीपमाला असून रात्री त्यात दिवे लावले गेले की आगळीच शोभा दिसते.

Leave a Comment