करोनाला मात देणाऱ्या आजींचा आनंदाने डान्स

फोटो साभार इंडीयन एक्सप्रेस

पुण्यात करोना संक्रमितांचे प्रमाण मोठे असून येथील औध रुग्णालयात करोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या एका आजीबाई उपचारासाठी दाखल होत्या. १६ दिवसांच्या लढाईनंतर आजी करोनामुक्त झाल्या असून त्यांना घरी सोडले गेले तेव्हा त्यांनी हॉस्पिटल बाहेरच अतिशय उत्साहाने डान्स करून त्यांचा आनंद व्यक्त केला. आजीच्या उत्साहाने अन्य रुग्णांना बळ मिळाले असून हॉस्पिटल मधील स्टाफनेही आजींच्या मार्गात फुले उधळली. त्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे.

या हॉस्पिटल मधील डॉक्टर शर्मिला गायकवाड म्हणाल्या, १६ दिवसांपूर्वी आजींना येथे दाखल केले गेले तेव्हा त्यांची तब्येत गंभीर होती. त्यांना संधीवात आहे शिवाय मधुमेह आहे. करोना तपासणी पोझिटिव्ह आल्यावर त्याना येथे आणले गेले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होता. खोकला होता. त्यामुळे त्यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरु होते. १२ दिवसांनंतर त्याची प्रकृती सुधारू लागली आणि आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत.

त्या येथे आल्या तेव्हा त्यांना आपण बरे होऊन घरी परत जाऊ शकणार नाही असे वाटत होते असे येथील नर्स म्हणाल्या. बरे झाल्यावर त्यांनी सर्व डॉक्टर, नर्स आणि अन्य स्टाफला धन्यवाद दिलेच पण तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे. तुम्हाला कधीच विसरणार नाही असेही सांगितले. हॉस्पिटल बाहेर येताच त्यांनी सांधेदुखी विसरून नाच करून आनंद व्यक्त केला.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, करोनातून बरे होऊन घरी गेल्याचे स्वागत केल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले पण हॉस्पिटल बाहेर डान्स करतानाचा आजींचा हा व्हिडीओ प्रथमच पाहिला. त्यामुळे करोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने त्याचा सामना करा असा संदेश जनतेला मिळाला आहे.

Leave a Comment