राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना घेतलेले ‘हे’ निर्णय कायम स्मरणात राहतील


नवी दिल्ली : आज तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देऊन, भारताला आधुनिक जगाची कवाडं उघडून देणाऱ्या माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. राजीव गांधी सुरुवातीच्या काळात राजकारणापासून काहीसे दूरच होते. पुढे संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर भारताचे सर्वात तरुण पंतप्रधानही राजीव गांधी झाले. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान 21 मे 1991 रोजी चेन्नईजवळ एका प्रचारसभे दरम्यान लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली आणि भारताचा संगणकयुगात प्रवेश करण्यासाठी धडपणारा हा तरुण नेत्याने भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन जगाचा निरोप घेतला.

राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना घेतलेले निर्णय
1- मतदान करण्याची वयमर्यादा कमी केली – राजीव गांधी पंतप्रधान होण्याआधी आपल्या देशात मतदान करण्यासाठी 21 वर्ष वयाची अट होती. युवा पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मते ही अट चुकीची होती. त्यानुसार त्यांनी 18 वर्ष पूर्ण युवकांना मतदानाचा अधिकार दिला. 61 वी घटनादुरुस्ती 1989 मध्ये करत मतदान करण्याची अट 21 वरुन 18 वर्ष केली. म्हणूनच आता 18 वर्षाचे युवक हक्काने मतदान करुन आपला प्रतिनिधी निवडू शकतात.

2-संगणक क्षेत्रात क्रांती – तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी काही पावले आज भारत उचलत आहे. राजीव गांधी यांनी त्याचा पाया रचला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतात संगणक क्रांती आणण्याचे श्रेय राजीव गांधींना दिले जाते. त्यावेळी त्यांचे असे म्हणणे होते की, उद्योगांचा विकास विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय शक्य नाही. भारतातील लोकांपर्यंत त्यांनी केवळ संगणकच पोहोचवले नाहीत तर माहिती तंत्रज्ञानाला (आयटी) पुढे घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका बजावली.

3- पंचायतीराज व्यवस्थेचा पाया – पंचायतीराज व्यवस्थेचा पाया रचण्याचे श्रेय देखील राजीव गांधी यांनाच जाते. राजीव गांधी यांचे असे म्हणणे होते की, पंचायती राज जोपर्यंत व्यवस्था मजबूत होत नाही, तोपर्यंत देशातील अंतिम घटकांपर्यंत लोकशाही पोहचू शकत नाही. आपल्या कार्यकाळात त्यांनी पंचायतीराज व्यवस्थेबाबत एक संपूर्ण प्रस्ताव तयार केला. 21 मे 1991 ला त्यांची हत्या झाल्यानंतर एका वर्षाने त्यांचा हा विचार प्रत्यक्षात उतरला. 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती 1992 मध्ये करत पंचायतीराज व्यवस्थेचा उदय झाला. राजीव गांधींच्या सरकारने केलेल्या 64 व्या घटनादुरुस्तीच्या आधारे नरसिम्हा राव सरकारकडून हे विधेयक पारीत करण्यात आले आणि संपूर्ण देशात 24 एप्रिल 1993 पासून पंचायती राज व्यवस्था लागू झाली.

4-नवोदय विद्यालय – राजीव गांधींनीच ग्रामीण आणि शहरी भागात नवोदय विद्यालयांचा पाया देखील रचला. जवाहर नवोदय विद्यालये त्यांच्या कार्यकाळात सुरु झाली. ही आवासी विद्यालय आहेत. या विद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्याचबरोबर 6 वी ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा मिळते.

5- राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NPE) घोषणा – राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NPE) घोषणा देखील राजीव गांधी यांनीच केली. 1986 मध्ये राजीव गांधी सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NPE) घोषणा केली. पूर्ण देशात या धोरणांतर्गत उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि विस्तार झाला.

6-दूरसंचार क्षेत्रात क्रांती – संगणक क्रांतीसोबतच राजीव गांधी यांना देशात दूरसंचार क्रांती देशात आणण्याचे श्रेय देखील जाते. ऑगस्ट 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या पुढाकाराने भारतीय दूरसंचार नेटवर्कची स्थापना करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्सची (C-DOT) स्थापना झाली. या अंतर्गत शहरापासून गावांपर्यंत दूरसंचाराचे जाळे पसरवण्याचे काम सुरु झाले आणि जागोजागी पीसीओसारखी सुविधा सुरु झाली. गावखेड्यातील जनता दूरसंचार क्रांतीमुळे शहरे आणि जगाशी एकरुप होऊ लागली. राजीव गांधी यांनी त्यानंतर 1986 मध्ये एमटीएनएलची स्थापना केली.

राजीव गांधी यांची कारकिर्द :

  • 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत राजीव गांधी यांचा यांचा जन्म झाला. राजीव गांधी यांचे नाव त्यांचे आजोबा म्हणजे पंडीत जवारहलाल नेहरु यांच्या पत्नीच्या नावावरुन ठेवण्यात आले. पंडीत नेहरुंच्या पत्नीचे नाव कमला नेहरु. कमला म्हणजे लक्ष्मी आणि ‘राजीव’ हे सुद्धा कमळाचे दुसरे नाव असल्या त्यामुळे ‘राजीव’ असे इंदिरा गांधी यांच्या या पहिल्या मुलाचे नाव ठेवण्यात आले.
  • ‘फ्लाईंग क्लब’चे राजीव गांधी हे सदस्य होते. राजीव गांधी हे त्यांनी तेथे सिव्हिल एव्हिएशनचे प्रशिक्षण घेतले. 1970 साली एअर इंडियामध्ये कामास सुरुवात करणाऱ्या राजीव गांधी यांनी 1980 साली राजकारणात प्रवेश केला.
  • राजीव गांधी यांना संगणक, गॅजेट्स यांमध्ये अधिक रस होता. त्यांनी पंतप्रधान म्हणूनही देशात तंत्रज्ञानासंबंधी विकासात पुढाकार घेतला. भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात ताकदवान बनवण्याचे स्वप्न त्यांनी कायम बाळगले आणि ते पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णयही घेतले. भारताला संगणकयुगात आणणारा पंतप्रधान म्हणूनही त्यांची ओळख आहे.
  • राजीव गांधी यांची 1981 साली युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर राजीव गांधी हे भारताचे आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. काँग्रेसने 1984 साली राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात ऐतिहासिक विजय मिळवला होता. लोकसभेच्या 542 जागांपैकी काँग्रेसला 411 जागा मिळाल्या होत्या.
  • राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स घोटाळा, भोपाळ दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसनचं देशाबाहेर पलायन इत्यादी गोष्टींवरुन आरोपही झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरण बाहेर काढल्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. आधी मंत्रिमंडळातून बाहेर, मग काँग्रेसमधूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
  • राजीव गांधी यांनी डिजिटल क्रांतीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. राजीव गांधी यांनी 1986 साली ‘जवाहर नवोदय विद्यालय योजना’ ही महत्त्वपूर्ण योजना आणली. या योजनेत 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत निवासी शिक्षणाची तरतूद होती. या योजनेची सर्वच स्तरातून स्तुती झाली होती.
  • राजीव गांधी यांनी 1988 साली लिट्टेविरोधात लढण्यासाठी श्रीलंकेच्या मदतीसाठी शांतीसैनिक पाठवले. त्याची परिणीती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. आणि लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान 21 मे 1991 रोजी चेन्नईजवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत, राजीव गांधी यांची हत्या केली. त्यानंतर लिट्टेला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. पुढे जगातील 32 देशांनी लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली.

Leave a Comment