कोलकाता/भुवनेश्वर : बुधवारी (20 मे) ताशी 190 किमी वेगाने आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 10 ते 12 जणांचा या वादळामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशमध्ये हटिया बेटाच्या किनाऱ्यावर धडकले. समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. मोठ्या संख्येने वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले, घरांचीही पडझड झाली.
पश्चिम बंगाल, ओडिशाला धडकले अम्फान चक्रीवादळ; 10 ते 12 मृत्युमुखी
West Bengal: Streets in Kolkata waterlogged, trees uprooted and houses damaged due to strong winds and heavy rain as #Amphan crossed West Bengal-Bangladesh coast between Digha (West Bengal) and Hatiya Islands (Bangladesh) across Sunderbans, between 1530 and 1730 hrs today. pic.twitter.com/obYlwiW9TO
— ANI (@ANI) May 20, 2020
याबाबत माहिती देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या वादळामुळे बंगालचे झालेले नुकसान शब्दात सांगता येणार नाही. पण या वादळामुळे किमान 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. नेमके किती नुकसान या वादळामुळे झाले याचा अंदाज बांधण्यासाठी अजून काही दिवस लागतील.
चक्रीवादळाचा कहर पश्चिम बंगालच्या तुलनेत ओडिशामध्ये काहीसा कमी दिसला. या वादळाचा सर्वाधिक परिणाम ओडिशाच्या बालासौर, भद्रक आणि केंद्रपाडामध्ये दिसला. हवेचा वेग या परिसरांमध्ये ताशी 110 किमीपेक्षा जास्त नव्हता. तरीही ओडिशामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
स्थानिक प्रशासनाने चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील जवळपास 6 लाख 58 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याच्या वेळी चक्रीवादळाच्या केंद्राजवळ हवेचा वेग ताशी 160-170 किमी होता. हावडा आणि उत्तरेकडील 24 परगना जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
त्याचबरोबर एनडीआरएफचे संचालक एस एन प्रधान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ओडिशामध्ये 20 पथके तैनात करण्यात आली आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 19 पथके तैनात आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी ओदिशामध्ये रस्ते रिकामे करण्याची मोहीम सुरु केली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेल्या पथकांनीही नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. पश्चिम बंगालमध्ये सुमारे पाच लाख आणि ओदिशात सुमारे 1.58 लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
दरम्यान चक्रीवादळाच्या वाटचालीचा पुढचा अंदाज हवामान विभागाने जारी केला होता. यानुसार अम्फान चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किमी वेगाने बांगलादेशात पोहोचून यानंतर बांगलादेशच्या सीमेवरुन बाहेर पडत मेघालय आणि आसाममध्ये शांत होईल.