अनुष्काच्या ‘पाताल लोक’ला कायदेशीर नोटीस


अभिनेत्री अनुष्का शर्माची पहिलीवहिली वेब सीरिज ‘पाताल लोक’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रेक्षकांना सीरिजमधील पात्र विशेष आवडत असल्याचे सध्यातरी दिसत आहे. पण ही सीरिज आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी सीरिजची निर्माती अनुष्का शर्माला कायेदशीर नोटीस बजावल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.

१८ मे रोजी अनुष्काला पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये जातीवाचक शब्दांचा वापर सीरिजमध्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर नेपाळी समुदायाचा या शब्दांच्या वापरामुळे अपमान झाल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘द क्विंट’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक महिला पोलीस अधिकारी या सीरिजच्या दुसऱ्या भागामध्ये दिसत आहे. चौकशीदरम्यानच्या दृष्यामध्ये ती नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीचा त्याच्या जातीवरुन उल्लेख करते. केवळ नेपाळी शब्दांचा वापर करण्यात आला असता तर आम्हाला कोणतीही अडचण नव्हती. पण त्यानंतर वापरण्यात आलेल्या शब्दावर आमचा आक्षेप आहे. या सीरिजची अनुष्का शर्मा निर्माती असल्यामुळे तिला नोटीस पाठवण्यात आल्याचे गुरुंग यांनी अनुष्काला पाठलेल्या लीगल नोटीसमध्ये म्हटले आहे. अनुष्काला पाठवण्यात आलेल्या नोटीसवर तिने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

त्याचबरोबर या संदर्भात ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, जातीवाचक शब्द वापरल्यामुळे गोरखा सुमदायने देखील नाराजी व्यक्ती केली असून सीरिजमधून हा शब्द काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. या विरोधात १८ मे रोजी ऑनलाइन याचिका दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या याचिकेत सीरिजमधील हा शब्द म्यूट करण्यात यावा आणि सबटायटलमध्ये ब्लर करण्याची मागणी केली जात आहे.

१५ मे रोजी अॅमेझॉन प्राईमवर ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज रिलीज करण्यात आली आहे. या थ्रीलर क्राईम सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी हे कलाकार अभिनय करताना दिसत आहेत. या सीरिजची कथा NH10 आणि उड़ता पंजाबचे लेखक सुदीप शर्मा यांनी लिहिली आहे.

Leave a Comment