आयपीएलबाबत बीसीसीआय सीईओंची महत्वपूर्ण अपडेट; या कालावधीत होऊ शकते स्पर्धेचे आयोजन


नवी दिल्ली – देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात मोलाची भूमिका बजावणाऱ्या बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या असून भारतात गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नाही. कोरोनाच्या संकटामुळे २९ एप्रिलपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. पण आयपीएल रद्द केल्यामुळे बीसीसीआयला सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे आयपीएलचे आयोजन कोणत्याही परिस्थितीत करायचेच असा चंग बीसीसीआयने सध्या बांधला आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्याने आयपीएलबद्दल नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तानुसार, आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयोजन करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यातच आता आयपीएल बद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोहरी यांनी दिली आहे.

देशभरात गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जेवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा आस्वाद घेतला. क्रिकेट हाच प्रायोजकांसाठी नेता आहे आणि तोच त्यांना मार्ग दाखवतो. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा क्रिकेटमुळे जनजीवन सुरळीत होण्यास लवकर मदत होईल. जगाला आणि देशाला कोरोनातून सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल यात वादच नाही. ही एका दिवसात होणारी प्रक्रिया नक्कीच नसल्याचे जोहरी यांनी टीसीएम स्पोर्ट्स हडल वेबिनारमध्ये नमूद केले.

विमानसेवा जेव्हा सुरू होईल तेव्हा स्पर्धा सुरू होण्याआधी प्रत्येकाला स्वत:ला क्वारंटाईन करावे लागेल. प्रत्येक खेळाडूचे वेळापत्रक कसे आहे, याबाबत माहिती घेऊनच त्यावर विचार करण्यात येईल. आयपीएलबाबत आम्ही सर्वचजण खूप आशावादी आहोत. आम्ही आशा करतो की पावसाळा संपेपर्यंत परिस्थिती सुधारलेली असेल. म्हणून आम्ही पावसाळ्यानंतर आयपीएलच्या आयोजनाचा विचार करत असल्याची माहिती जोहरी यांनी दिली आहे.

Leave a Comment