25 तारखेपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत हवाई प्रवासाचे तिकीट दर निश्चित


नवी दिल्ली : येत्या 25 मेपासून देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी देशांतर्गत विमान वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. सर्व विमानतळे त्यासाठी सज्ज ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर विमान कंपन्यांकडून प्रवाशांची कोरोनाच्या या संकटाच्या काळात लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत. दिल्ली आणि मुंबई 90 ते 120 मिनिटांच्या विमान प्रवासासाठी कमीत कमी 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये असणार आहे. 24 ऑगस्टपर्यंत हे दर लागू राहणार असल्याची माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी दिली.

दरम्यान परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत मिशन अंतर्गत 20 हजाराहून अधिक लोकांना घरी परत आणल्यानंतर अधिक भारतीय नागरिकांना हळूहळू भारतात परत आणले जाईल, असे हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे.

हरदीपसिंग पुरी पुढे म्हणाले की, 25 मे पासून सुरू होत असलेल्या विमानांमध्ये प्रवाशांना प्रोटेक्टिव्ह गिअर, फेस मास्क घालणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर सॅनिटायझरची बाटली ठेवणे बंधनकारक आहे. विमान प्रवासादरम्यान जेवणाची सोय केली जाणार आहे. उड्डाणावेळी पाण्याची बाटली गॅलरी क्षेत्रात आणि जागेवर देण्यात येणार आहे. देशांतर्गत वाहतूक सेवेच्या अनुभवावरच आम्ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरु करण्याचा विचार करत असल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment