राम मंदिर परिसरात खोदकाम करताना सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब


अयोध्या – राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद कायमचा मिटल्यानंतर अखेर प्रत्यक्षात राम मंदिरच्या उभारणीला सुरूवात झाली असून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी मागील दहा दिवसांपासून काम सुरू असून, जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब जागेचे सपाटीकरण करण्यासाठी केलेल्या खोदकामावेळी सापडले आहेत. त्याचबरोबर या परिसरात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तुंचे अवशेष सापडले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे सर्वच कामे ठप्प होती. केंद्र सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात बांधकामांना मूभा दिली असून, अयोध्येत मागील दहा दिवसांपासून राम मंदिराच्या उभारणीलाही सुरूवात झाली आहे. केंद्राने राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापन केली होती. मंदिराच्या कामाला या ट्रस्टच्या देखरेखीखाली सुरूवात झाली आहे.

दरम्यान, अयोध्येतील नियोजित ठिकाणी राम मंदिर उभारण्यात येणार असून सध्या जागेच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले असून, अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब खोदकामावेळी आढळून आले आहेत. काम दहा दिवसांपासून सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, मंदिर उभारणीच्या कामासाठी मागील दहा दिवसांपासून जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचे अवशेष सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडल्याची माहिती राय यांनी दिली.

९ नोव्हेबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर ऐतिहासिक निकाल देत राम मंदिराचे निर्माण वादग्रस्त जागेवर करण्यात यावे आणि यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावी. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरकारने काम सुरू केले आहे.

Leave a Comment