पगार मागितला म्हणून कामावरुन काढले; आता तोच डॉक्टर रुग्णालयासमोर विकत आहे चहा


नवी दिल्ली – एकीकडे सर्व देश कोरोनाविरोधात लढाई लढत असतानाच देशभरात अनेक विचित्र घटना घडत आहेत. त्यातच हरियाणामधील कर्नालमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. आपल्या नवविवाहित पत्नीसोबत येथील एक तरुण डॉक्टरने चहाविक्रीचा उद्योग सुरु केला आहे. रुग्णालय प्रशासनाकडे या तरुण डॉक्टरने दोन महिन्यांपासून न मिळालेला पगार देण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर आपल्याला रुग्णालय प्रशासनाने नोकरीवरुन काढून टाकल्याचा आरोप या डॉक्टरने केला आहे. पंजाब केसरीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्याकडेला डॉक्टरांचा अ‍ॅप्रन घालून चहा विक्री करणाऱ्या या डॉक्टरचे नाव गौरव वर्मा असे असून आपल्याला मागील दोन महिन्यापासून पगार न मिळाल्याची चौकशी केली असता माझी बदली करण्यात आली. त्यानंतर मी या बदलीचा विरोध केला तर मला नोकरीवरुनच काढून टाकण्यात आल्याचा आरोप गौरवने केला आहे. नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर गौरवने आता सेक्टर १३ मध्ये आपली चहाची टपरी सुरु केली आहे. तो डॉक्टरचे अ‍ॅप्रन घालून या टपरीवर चहा विकतो. संबंधित रुग्णालयावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी गौरवने केली आहे.

या डॉक्टरने रुग्णालय ज्या कंपनीच्या मालकीचे आहे त्या कंपनीमधील वरिष्ठांशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला. पण माझे काहीही ऐकून घेण्यात न आल्याचा आरोपही गौरवने केला आहे. पगारबद्दल चौकशी करताच गौरवची बदली गाझियाबादमधील कंपनीच्या दुसऱ्या रुग्णालयात करण्यात आली. गौरवने याला विरोध केल्यानंतर नोकरीवरुन काढून टाकण्याचे पत्रच त्याला देण्यात आले. गौरवने यासंदर्भात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडेही रितसर तक्रार केली आहे. पण त्याला देखील काहीच उत्तर मिळालेले नाही. अखेर संतापलेल्या गौरवने रुग्णालयाच्या गेटसमोरच चहाची टपरी सुरु केली आहे.

या प्रकरणाची आपल्यापर्यंत तक्रार आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक असणाऱ्या डॉक्टर अश्विनी अहूजा यांनी सांगितले आहे. सध्या या प्रकरणासंदर्भात कोणतेही मत देणे चुकीचे ठरेल. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतरच याबद्दल मत व्यक्त करता येईल. मी चौकशीनंतरच याबद्दल काही बोलू शकेन. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती अश्विनी यांनी दिली.

सध्या लॉकडाउन सुरु असल्याने डॉक्टरांना पगार देण्यात अडचणी येत असल्याचे कर्नालमधील रुग्णालयाचे प्रमुख असणाऱ्यांनी म्हटले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर गौरवने लावलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. अनेकदा बेकायदेशीर काम करताना गौरव यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांना या संदर्भात तीन ते चार नोटीस पाठवून अनेकदा समजही देण्यात आली आहे. गौरवला भेटून बोलण्याची इच्छा कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली गौरवने त्यावेळी भेटण्यास नकार दिला. रुग्णालय प्रशासनाशी गौरवला काही अडचण असल्यासे बसून त्यावर चर्चा करुन यासंदर्भातील उपाय शोधता येईल असे मत रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment