सर्वाधिक कोरोनाग्रस्त अमेरिकेत असणे गर्वाची बाब – ट्रम्प

अमेरिकेत कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाखांच्या पुढे गेला आहे. तर या व्हायरसमुळे 90 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असणे गर्वाची बाब असल्याचे म्हटले आहे.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प म्हणाले की जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त अमेरिकेत असणे हे ‘बॅज ऑफ ऑनर’ आहे. मी काही प्रमाणात ही एक चांगली गोष्ट आहे, या दृष्टीने पाहतो. याचा अर्थ होतो की आपली टेस्टिंग सर्वात चांगली आहे. जेव्हा आपण कोरोनाच्या बाबतीत अमेरिका जगात सर्वात पुढे आहोत असे म्हणतो, तेव्हा याचा अर्थ आपल्याजवळ दुसऱ्यांपेक्षा अधिक टेस्टिंग सुविधा आहेत.

ट्रम्प म्हणाले की, अनेक प्रोफेशनल लोकांनी जे काम केले व टेस्टिंग केले, त्यांच्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनुसार, 19 मे पर्यंत अमेरिकेत 1 कोटी 26 लाख कोरोना टेस्टिंग करण्यात आल्या आहेत. एकूण टेस्टिंगच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. मात्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डाटानुसार ‘पर कॅपिटा बेसिस’च्या आधारावर अमेरिका पहिल्या स्थानावर नाही. ऑक्सफर्डनुसार, प्रति हजार व्यक्तीमागे करण्यात आलेल्या टेस्टमध्ये अमेरिका 16व्या क्रमांकावर आहे. तर आइसलँड, न्यूझीलंड, कॅनडा याबाबतीत पुढे आहेत.

Leave a Comment