उत्तम, आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी करा या सवयींचा अवलंब


आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही गोष्टी सवयीचा भाग कधी होऊन जातात हे आपले आपल्यालाच कळत नाही. ह्यातील काही सवयी जर आपण प्रयत्नपूर्वक बदलल्या किंवा नव्याने अवलंबिल्या, तर आपले आयुष्य अधिक सुंदर, अधिक आरोग्यपूर्ण होऊ शकते. अगदी रोजची सवय, म्हणजे आपली जेवण्याची पद्धत. काहींना मोबाईल फोन पाहता पाहता जेवण्याची सवय असते, तर काहींना टीव्हीपुढे बसून जेवण्याची. अश्या वेळी आपले लक्ष जेवणाकडे नसून पुढ्यात असणाऱ्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर सुरु असणाऱ्या मालिकेमध्ये असते. ही सवय आपण सर्वप्रथम बदलायला हवी. जेवताना प्रत्येक घास सावकाश चावून खाल्ला जावा. त्यामुळे भूक लवकर शमते, शिवाय अन्नाचे पचनही व्यवस्थित होते. सावकाश जेवल्याने भोजनाचा आस्वादही घेता येतो. म्हणूनच आपल्याकडे भोजनाला बसल्यानंतर ‘ सावकाश जेवा ‘ असे सांगण्याची पद्धत आहे. तसेच आपल्या भोजनामध्ये भरपूर भाज्यांचा समावेश करण्याची सवय लाऊन घेणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे. जितकी भूक आपल्याला असेल, त्यापेक्षा थोडेसे कमी भोजन खाल्ले जाईल ह्याची काळजी घ्यावी.

दररोज किमान दहा हजार पावले चालण्याची सवय आत्मसात करा. सुरुवातीला ही संख्या तुम्हाला खूपच जास्त वाटेल. पण दररोज इतके चालणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे तज्ञ म्हणतात. अॅक्वहीटी ट्रॅकर च्या मदतीने तुम्ही दररोज किती पावले चालता ह्याचा अंदाज घेऊ शकता. तुमच्या दररोजच्या कामांमध्ये शक्य तिथे चालत जायचे ठरविले तर हे टार्गेट नक्कीच पूर्ण होऊ शकते.

झोपण्याची आणि उठण्याची ठराविक वेळ असेल असे पहा. शरीराला आवश्यक तेवढी विश्रांती मिळणे गरजेचे असते. विश्रांती घेतल्याने मानसिक तणाव देखील कमी होण्यास मदात होते. जर झोप अपुरी राहत असेल, तर शरीर उर्जाहीन वाटते, लहान सहान कारणांवरून मनस्ताप, चिडचिड सुरु होते. रात्री काही कारणाने उशीरा झोपले तर दुसऱ्या दिवशी उठण्यास उशीर होऊन मग कामाची धांदल उडते. त्यामुळे आणखीनच मनस्ताप सोसावा लागतो. यासाठी झोपण्याची आणि उठण्याची निश्चित वेळ पाळली जाणे आवश्यक आहे. तसेच झोपण्याच्या अर्धा तास आधी आपला फोन, टीव्ही, आणि तत्सम इतर वस्तूंचा वापर बंद करावा.

आपल्या आहारामधील साखरेचे प्रमाण अर्धे करा. एकाएकी साखर एकदमच सोडून देणे कठीण असल्याने ही मात्रा अर्धी करण्याचा निश्चय करून त्या सवयीचा नियमाने अवलंब करा. तसेच दररोज काही काळ मेडीटेशन ची सवय अवलंबा. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य दूर होण्यास मदत होईल. आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून लांब राहण्याची सवय आत्मसात करा. त्याऐवजी सकारात्मक दृष्टीकोन असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क वाढवा.

दैनंदिन आयुष्याच्या धावपळीमध्ये थोडेसे आत्मपरीक्षण करणेही आवश्यक आहे. ह्यासाठी आपले विचार डायरी मध्ये लिहून ठेवण्याची सवय लावून घ्या. आपल्या मनातील काळज्या, तणाव, इतर समस्या, तसेच आपल्याला आनंद, समाधान देणाऱ्या गोष्टी कागदावर उतरवा. ह्याचा उपयोग एखाद्या थेरपी प्रमाणे होतो. ह्यामुळे तुम्हाला मनस्वास्थ्य मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment