फक्त ५ हजारात सुरु करू शकता हा व्यवसाय

फोटो साभार इंडिया टुडे

नोकरी करण्याची इच्छा नाही किंवा करोनाच्या प्रभावामुळे नोकरी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने अनेकांना कमाई साठी काही मार्ग शोधणे आवश्यक बनले आहे. अश्या लोकांसाठी कमी भांडवलात व्यवसाय सुरु करण्याची संधी आहे. पब्लिक सेक्टरशी संबंधित असलेला हा व्यवसाय मालकाला चांगली कमाई करून देण्यास उपयुक्त ठरणारा आहे. हा व्यवसाय आहे चहा, दुध, लस्सी सारख्या पेयांसाठी वापरले जाणारे मातीचे कुल्हड.

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी रस्ते परिवहन बरोबरच रेल्वे मंत्रालयाने देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक किंवा कागदी कपांऐवजी मातीचे कुल्हड वापरणे बंधनकारक करावे अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने प्रमुख रेल्वे स्थानके, विमानतळ, बस स्थानके, मॉल्स येथे मातीचे कुल्हड वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. इतकेच नव्हे तर मोदी सरकारने कुंभार सशक्तीकरण योजना त्यासाठी आखली आहे.

या व्यवसायाला मदत करण्यासाठी कुल्हड बनविता येतील अशी इलेक्ट्रिक चाके केंद्र सरकार पुरविणार असून यंदाच्या वर्षात अशी २५ हजार चाके खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. तयार झालेले कुल्हड खरेदीसाठी किमती ठरविल्या गेल्या आहेत. खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना म्हणाले, अगदी थोड्या जागेत हा व्यवसाय सुरु करता येतो. कुल्हड खरेदी भाव किमान ५० रुपये १०० नग असा असून लस्सी साठी मोठे कुल्हड १०० नगाला १५० रुपये आणि प्याला टाईप कुल्हड १०० नगाला १०० रुपये हमी भावाने खरेदी केले जाणार आहेत. यामुळे प्लास्टिक वापर कमी होऊन प्रदूषण कमी होईल.

याचबरोबर इच्छुक व्यावसायिक चहा, दुध व्यवसायही करू शकतील. चांगल्या स्टेशनवर चहा दुध विक्रीतून दररोज १ ते दीड हजार रुपयाची कमाई करता येते असेही त्यांनी सांगितले. आज अनेक ठिकाणी कुल्हड मधून चहा, लस्सी, दुध विकले जात असून दिवसेंदिवस कुल्हडची मागणी वाढणार आहे.

Leave a Comment