चांदीच्या मास्कने सोनाराची झाली चांदी

फोटो साभार न्यूज १८

देशात करोना संक्रमितांची १ लाखाहून अधिक झालेली संख्या आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवसाय अडचणीत आले असताना बेळगाव जिल्ह्यातील एका सोनाराने डोके चालवून तयार केलेल्या चांदीच्या मास्क मुळे त्याचा व्यवसाय एकदम तेजीत आला आहे. या सोनाराचे नाव संदीप साळगावकर. करोना साथ लवकर आटोक्यात येण्याची काही चिन्हे नाहीत आणि मास्कचा उपयोग दीर्घकाळ करावा लागणार हे लक्षात घेऊन संदीप याना चांदीचे मास्क बनविण्याची कल्पना सुचली. लॉक डाऊन मुळे त्यांचाही व्यवसाय जवळ जवळ बंद पडत चालला होता पण चांदीच्या मास्कने त्यांना या संकटातून टाळले.

संदीप सांगतात, लॉक डाऊन असला तरी हा विवाहाचा सिझन आहे. विवाह सुद्धा मास्क घालून केले जात आहेत हे पाहून मला चांदीचा मास्क बनवावा असे सुचले. त्याप्रमाणे मी सुरवातीला ५० ग्रामचा डिझायनर चांदी मास्क बनविला आणि सहा कुटुंबांकडून या मास्कला मागणी आली. हे मास्क २५०० रुपयाप्रमाणे विकले गेले. तो पर्यंत या मास्क संबंधी लोकांना कळले होते आणि माझ्याकडची मागणी वाढली. मग २५ ते ३५ ग्राम वजनाचे मास्क बनविले तेही हातोहात संपले. लग्नात भेट देण्यासाठी म्हणूनही हे मास्क खरेदी केले जात आहेत.

संदीप कडून प्रेरणा घेऊन अन्य काही सोनारांनी सुद्धा चांदीचे मास्क बनवायला सुरवात केली आहे. सोशल मीडियावर हे मास्क व्हायरल झाले असून संदीप सांगतात आता आम्हाला व्हॉटसअप वरूनही मास्कच्या ऑर्डर येत आहेत. मास्क साठी चांदीचा विचार केला कारण सोन्याचा मास्क किमान २५ ते ३० हजारात जाणार आणि त्याला ग्राहक येईल याची खात्री नाही. शेवटी हा मास्क एकदाच कधीतरी वापरला जाणार म्हणून चांदीची निवड केली असेही संदीप यांनी सांगितले.

Leave a Comment