विराट कोहलीचा धक्कादायक खुलासा; लाच न दिल्यामुळे मला संघात नाही घेतले


नवी दिल्ली – टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली याच्याबद्दल बोलायचे झाले तर ते नक्कीच कमी पडणार आहे. त्याने आपल्या आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण अशाच विक्रमवीर कोहलीला एकेकाळी लाच न दिल्यामुळे संघा बाहेर बसण्याची वेळ आली होती. पण हे आम्ही नाही… तर खुद्द विराट कोहलीच सांगत आहे.

विराट कोहलीने दिल्लीच्या किशोर संघाच्या निवडीच्या वेळी घडलेला हा प्रकार असल्याचे सांगितले आहे. फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत व्हिडीओ कॉन्फरेंसिंग द्वारे संवाद साधताना कोहलीने सांगितले की मी खेळत असलेल्या दिल्ली क्रिकेट बोर्डामध्ये काहीवेळा अशा गोष्टी घडतात, ज्या योग्य नसतात. एक वेळ अशी आली होती की संघनिवड करताना क्षमतेच्या आधारे निवड केली गेली नव्हती. कोहली म्हणाला की माझ्यामध्ये क्षमता असतानाही संघातील स्थान पक्के व्हावे यासाठी माझ्या वडिलांकडे लाच मागितली होती.

कोहलीचे वडील हे पेश्याने वकील होते. विराट भूतकाळात घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना म्हणाला की माझे वडील हे प्रामाणिक मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. त्यांना पहिल्यांदा आणखी काहीतरी हवे याचा अर्थ कळाला नव्हता. जेव्हा त्यांना अर्थ कळाला तेव्हा त्यांनी लाच मागणाऱ्याला सांगितले की विराटला निवडायचे असेल तर त्याच्या क्षमतेवर निवडा, मी तुम्हाला आणखी काहीही देणार नाही. वडिलांच्या उत्तरानंतर माझी संघात निवड झाली नाही.

संघात निवड न झाल्यामुळे मी खूप रडलो, असे कोहलीने सांगितले. या मुलाखतीमध्ये विराट म्हणाला की, या अनुभवाने मला बरच काही शिकवले. यशस्वी बनायचे असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनले पाहिजे ही शिकवण मिळाली. विराट म्हणाला की यश मिळवण्यासाठी स्वत:ला कष्ट करावेच लागतील आणि माझ्या वडिलांनी शब्दांऐवजी कृतीतून मला योग्य मार्ग दाखवला होता.

18 वर्षांचा असताना विराट रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत होता. त्याचवेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. 2006 साली दिल्ली विरूद्ध कर्नाटक सामना सुरू असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. आदल्या रात्री वडिलांना प्राण सोडताना पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोहली मैदानात उतरला होता आणि त्याने महत्वपूर्ण खेळी करत दिल्लीला पराभवापासून वाचवले होते.

Leave a Comment