नवाजुद्दीनला पत्नीने ऑनलाईन पाठवली घटस्फोटाची नोटीस


लॉकडाऊन दरम्यान ईद साजरी करण्यासाठी उत्तर प्रदेशात दाखल झाल्यामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सोशल मीडियात जोरदार चर्चा झाल्यानंतर तो आता पुन्हा एकदा आपल्या कौटुंबिक विषयामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनला त्याची पत्नी आलिया हिने घटस्फोटासाठीची नोटीस पाठवली आहे. इमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे ७ मे रोजी नवाजुद्दीनला नोटीस पाठवली असून त्याला त्याच्याकडून अद्याप काहीच उत्तर आले नसल्याची माहिती आलियाच्या वकिलाने ‘झी न्यूज’ या वृत्त वाहिनीसोबत बोलताना दिली.

७ मे रोजी आम्ही आलिया सिद्दिकी यांच्याकडून नवाजुद्दीन यांना नोटीस पाठवली आहे. स्पीडपोस्टने नोटीस पाठवणे लॉकडाउनमुळे शक्य न झाल्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आलिया सिद्दिकी यांनीसुद्धा त्यांच्या व्हॉट्सअॅपद्वारे नवाजुद्दीनला नोटीस पाठवली आहे. पण यावर नवाजुद्दीन यांच्याकडून अजून काही उत्तर आलेले नाही. माझ्या मते ते फक्त या नोटीसबद्दल मौन बाळगत आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान त्या नोटीशीत केलेले आरोप काय आहेत याचा खुलासा मी करु शकत नाही. पण आलिया यांनी नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात काही गंभीर आरोप केल्याची माहिती आलिया यांच्या वकिलाने दिली. दहाहून अधिक वर्षे नवाजुद्दीन आणि आलिया यांच्या लग्नाला झाली आहेत. या दोघांना दोन मुले आहेत. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात २०१७ मध्येही चढउतार आले. पण त्यांनी अनेकदा घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्याचे वृत्त आहे.

आलिया सिद्दीकी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखती म्हणाली की, नवाजशी घटस्फोट घेण्यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत आणि ही सगळी कारणे गंभीर आहेत. नवाज आणि माझ्यात लग्नाच्या एक वर्षानंतर २०१० पासून मतभेद सुरू आहेत. प्रत्येक गोष्ट मी सांभाळून घेत होती. पण आता माझ्याकडून यापुढे ते सहन होणार नाही. आलियाने आपले नाव बदलल्याचीही माहिती दिली. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आलिया हे नाव बदलून अंजना आनंद किशोर पांडे असे ठेवले आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आम्ही कौटुंबिक न्यायालयात रितसर याचिका दाखल करु अशी माहिती आलियाचे वकील भविन सहाय यांनी दिली आहे.

Leave a Comment