स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबईला मिळाला ५ स्टार शहराचा दर्जा


नवी दिल्ली – कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल आज केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी जाहीर केले. यामध्ये कचरामुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराने ५ स्टार रेटिंग पटकावले आहेत. या रेटिंगमध्ये नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट आणि सूरत, कर्नाटकमधील म्हैसूर आणि मध्य प्रदेशातील इंदूर या शहरांनीही ५ स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे.

स्टार-रेटिंग अंतर्गत विकसित केलेल्या स्वच्छता निर्देशकांच्या प्रकारांवर स्वच्छ भारत अभियानाद्वारे शहरांचे रेटिंग आधारित आहे. कचरा संग्रहण, कचर्‍याचे स्त्रोत वेगळा करणे, कचर्‍यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे, भूगर्भशास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम उपक्रमांचे व्यवस्थापन, डंप रेमेडिएशन आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणाली यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

या रेटिंगमागे देशातील सर्व शहरे कचरामुक्त करणे हे मुख्य उद्दीष्ट असून घनकचरा, प्लॅस्टिक कचरा आणि बांधकाम उपक्रमांशी संबंधित कचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने सर्व शहरांमध्ये कसे करता येईल याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. केवळ ३ शहरांना गेल्या वर्षी ५ स्टार रेटिंग देण्यात आले होते. पण या वर्षी तब्बल ६ शहरांना ५ स्टार रेटिंग देण्यात आले आहेत.

Leave a Comment