उन्हाळ्यात देखील नष्ट होणार नाही कोरोना, अभ्यासात आले समोर

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव उन्हाळ्यात कमी होईल, असे वाटत असताना आता प्रिन्सटन यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासात वेगळाच दावा करण्यात आलेला आहे. जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या प्रिन्सटन यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, उत्तर गोलार्धामध्ये वाढणाऱ्या तापमानामुळे देखील कोरोनावर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. मागील काही महिन्यात झालेल्या अभ्यासात हवामान आणि कोरोना व्हायरसमध्ये संबंध असल्याचे समोर आले होते. यानुसार हवामान जेवढे गरम असेल व्हायरसचा प्रसार तेवढाच कमी होईल. मात्र हे निष्कर्ष सुरूवातीच्या टप्प्यातील होते. हवामान आणि व्हायरसमधील संबंधांबाबत अद्याप पुर्ण माहिती मिळालेली नाही.

प्रिन्सटन यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासात हवामान आणि व्हायरसमधील संबंध पुर्णपणे नाकारण्यात आलेला नाही. व्हायरसच्या प्रसारावर हवामानाचा थोडाफार परिणाम होतो, असे म्हटले आहे. या अभ्यासानुसार, ठोस पावले न उचलल्यास या महामारीचा उद्रेक होऊ शकतो व उन्हाळा यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही.

प्रिन्सटन पर्यावरण संस्थेमधील (पीईआय) पोस्टडॉक्टोरल रिसर्च असोसिएट रचेल बेकर म्हणाले की, गरम अथवा दमट वातावरण कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणार नाही. महामारीचा आकार आणि वेळेवर काही प्रमाणात हवामानाचा परिणाम दिसतो. मात्र लोकसंख्येमधील अतिसंवेदनशीलता असल्यामुळे कोणत्याही हवामानात व्हायरस त्वरित पसरतो. ब्राझील, इक्वाडोर आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये देखील दिसून आले की गरम हवामान व्हायरसचा प्रसार रोखू शकत नाही.

Leave a Comment