लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या कामगारांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहे. पुण्यातील एका 30 वर्षीय रिक्षाचालक देखील या कामगारांसाठी पुढे आला आहे. रिक्षाचालक अक्षय कोठावलेने आपल्या लग्नासाठी 2 लाख रुपये जमा केले होते. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. अशा स्थितीमध्ये अक्षयने आपल्या लग्नासाठी बचत केलेल्या पैशांद्वारे स्थलांतरित कामगारांच्या जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाहीतर आपल्या रिक्षातून तो वृद्ध नागरिक आणि गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये मोफत पोहचवत आहे.
कौतुकास्पद ! लग्नासाठी बचत केलेल्या पैशांद्वारे हा पुणेरी रिक्षाचालक करत आहे कामगारांच्या जेवणाची व्यवस्था
आपल्या मित्रांच्या साहय्याने अक्षय बचत केलेल्या पैशांद्वारे दररोज 400 लोकांना जेवण देत आहे. शहरातून फिरत गरजूंना ते जेवण वाटप करतात. अक्षयने सांगितले की, रिक्षा चालवून मी लग्नासाठी 2 लाख रुपये जमा केले होते. लग्न 25 मे ला निश्चित झाले होते, मात्र लॉकडाऊनच्या काळात लग्न करणे योग्य नसल्याचे आम्हाला वाटले. मी व माझ्या मित्रांनी या कामगारांना आणि गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला.
त्याने सांगितले की, रिक्षामधून आम्ही एकवेळेचे जेवण मालधक्का चौक, संगमवाडी आणि येरवडा या भागात वाटत असतो. पैशांची कमतरता जाणवू लागल्याने आता त्यांनी चपाती-भाजी ऐवजी पुलाव अथवा सांभर-भात देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मे पर्यंत गरजू लोकांची मदत करण्याचा त्यांचा मानस आहे.
याआधी मागील वर्षी सांगली, कोल्हापूर भागात आलेल्या महापुराच्या वेळी देखील अक्षय व त्याच्या मित्रांनी मदतीचा हात पुढे केला होता.