बीड – संचारबंदीचे आदेश डावलून कंटेनमेंट झोन मध्ये प्रवेश केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बीड शहरामध्ये कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अवघे शहर तणावाखाली असल्याची स्थिती आहे. त्यातच कंटेनमेंट झोनमध्ये जात धस यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला होता, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचे संकट रोखण्यासाठी व दूर करण्यासाठी राज्य प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकप्रतिनीधींनी त्या प्रति अधिक जबाबदारपणा दाखवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील आष्टीमधील पाटण सांगवी हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे या परिसरात संचारबंदी आदेश लागू आहे. असे असतानाही या परिसरात आमदार धस यांनी प्रवेश केला. उसतोड कामगारांना सोडविण्यासाठी आमदार धस यांनी जिल्हा बंदी आदेश डावलून प्रवेश केल्याचे पुढे आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 आहे. जिल्ह्यातील एका कोरोना संक्रमित महिलेला मृत्यूही झाला आहे. बीड जिल्ह्यात यापूर्वी कोरोनाबाधित आढळले नव्हते. पण गेल्या काही काळात पुणे, मुंबई आणि बीड बाहेरुन आलेल्या अनेक नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे.