मारुती ८०० परतणार, ‘इलेक्टिक’ अवतारात
फोटो साभार इलेक्ट्रिक व्हेईकल वेब
मारुती सुझुकीने काही वर्षांपूर्वी भारतीय ऑटो क्षेत्रावर राज्य गाजविलेली आणि आजही अनेकांची आवडती मारुती ८०० पुन्हा बाजारात आणण्याचा विचार सुरु केला असून यावेळी ती पेट्रोल डिझेल मध्ये नाही तर इलेक्ट्रिक अवतारात येईल असे संकेत दिले आहेत. अर्थात कंपनीने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र त्या संदर्भात एक स्केच जारी केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात मारुती ८०० इलेक्ट्रिकवर लवकरच काम सुरु होत असल्याचे संकेत दिले गेले आहेत.
हिंदुस्थान ऑटोच्या अँबेसीडर खालोखाल भारतीय ऑटो क्षेत्रात मारुती ८००चे अधिराज्य होते. १९८३ पासून तिचे उत्पादन सुरु झाले ते २०१४ पर्यंत सुरु होते. एक काळ असा होता कि मारुती ८०० खरेदीसाठी ग्राहकांच्या शो रूम बाहेर रांगा लागत असत. दीर्घ काळ ही गाडी रस्त्यावर दिसत होती. इतकेच नव्हे तर आजही ज्याच्याकडे ही कार आहे त्यांची ती विकण्याची तयारी नाही. मारुती सुझुकीने मारुती ८०० च्या सुमारे २७ लाख गाड्या विकल्या होत्या. मात्र नंतर तिची मागणी कमी झाल्याने उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.