बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डनच्या बुटांना विक्रमी किंमत

फोटो साभार इंग्लिश डायरी

अमेरिकेचा बास्केटबॉलचा महान खेळाडू मायकल जॉर्डन यांच्या बुटांना ऑनलाईन लिलावात विक्रमी किंमत मिळाली असून हे बूट ५.६० लाख डॉलर्स म्हणजे ४ कोटी २० लाख रुपयांना विकले गेले आहेत. ‘एअर जॉर्डन’ नावाने कंपनीने खास मायकल साठी हे बूट १९८५ साली बनविले होते आणि त्याने पहिल्या सिझन मध्ये शिकागो बुल्स कडून खेळताना वापरले होते.

लाल, पांढरा आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशन मधील या बुटांवर मायकलची सही आहे. सोद्बी लिलाव कंपनीला या बुटांना साधारण १ ते दीड लाख डॉलर्स किंमत अपेक्षित होती. प्रत्यक्षात ते त्याच्या पाचपट किमतीला विकले गेले. मायकल जॉर्डनने ९० च्या दशकात शिकागो बुल्स कडून खेळताना ६ एनबीए टायटल्स जिंकली असून तो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून निवडला गेला होता. त्यांच्या निवृत्ती नंतर त्याची २३ नंबरची जर्सी सुद्धा रिटायर केली गेली होती.

यापूर्वी नाईकीच्या स्निकर्स मधल्या ‘मून शु’ ला लिलावात सर्वाधिक किंमत मिळाली होती. जुलै २०१९ मध्ये झालेल्या या लिलावात ते बूट ४.३७ लाख डॉलर्स म्हणजे ३ कोटी २७ लाख रुपयांना विकले गेले होते मात्र ते बूट कुणीच वापरले नव्हते. २०१५ मध्ये लंडन मध्ये झालेल्या लिलावात अॅथलेट रोजर बेनिस्टरचे  शूज ३ कोटी ६ लाख रुपयांना विकले गेले होते. १९५४ मध्ये त्याने ४ मिनिटापेक्षा कमी वेळात १ मैल अंतर धावण्याचा पराक्रम केला होता.

Leave a Comment