डोनल्ड ट्रम्प घेताहेत मलेरियाच्या गोळ्यांचा खुराक

फोटो साभार  द अटलांटिक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी ते गेल्या आठवड्यापासून रोज झिंक आणि मलेरियासाठी दिले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या गोळ्याचा डोस घेत असल्याचे सोमवारी सायंकाळी सांगितले. करोना पासून बचाव व्हावा म्हणून ट्रम्प या गोळ्या घेत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांच्या संदर्भात इशारा जारी केला असून हे औषध फक्त कोविड १९ ची लागण झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांकरताच वापरले जावे असे स्पष्ट केले आहे. मात्र ट्रम्प यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध घेण्यासंदर्भात त्यांनी व्हाइट हाउसच्या डॉक्टरांना विचारले आहे. त्यावर डॉक्टरने त्यांना तुम्हाला काय वाटते, हे औषध घ्यावे का नाही असा उलट प्रश्न ट्रम्प याना विचारला तेव्हा ट्रम्प यांनी त्यांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन घ्यायचे आहे असे सांगितले. तेव्हा डॉक्टरनी मग घ्या असे म्हटल्याचे ट्रम्प सांगतात.

वास्तविक हायड्रोक्सिक्लोरोक्वीन कोविड १९ विरुद्ध फार उपयुक्त ठरलेले नाही. त्यामुळे हॉस्पिटल बाहेर या गोळ्यांच्या वापराबद्दल इशारा दिला गेला आहे. गेल्या महिन्यात भारताने अमेरिकेत कोविड १९ बाधितांच्या उपचारासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या लाखो गोळ्या निर्यात करण्याला परवानगी दिली होती. तेव्हापासून भारतातूनच हे औषध निर्यात होत आहे. अमेरिकेत कोविड १९ संक्रमितांची संख्या १५ लाखाच्या वर असून ९०६९४ जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Comment