जगातले सर्वाधिक उंचावरचे शिव मंदिर तुंगनाथ

फोटो साभार उत्तरखंड टुरिझम

देवांचे देव महादेव यांचा निवास कैलास पर्वतावर असतो अशी मान्यता आहे. अर्थात पहाडी भागात राहणारा हा एकच देव नसला तरी जगातील सर्वाधिक उंचावर असलेले मंदिर एक शिव मंदिरच आहे. उत्तराखंड राज्यातील चमोली पासून जवळ असलेले तुंगनाथ हे ते स्थान आहे. तुंगनाथ पंचकेदार पैकी दुसरे स्थान असून त्याचा भगवान रामाशीही संबंध आहे. या मंदिरात आजही चमत्कार घडतात असे सांगतात. येथे येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे.

उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग पासून सुरु होणाऱ्या टोंगनाथ पर्वत शृंखलेमध्ये हे मंदिर असून ते समुद्र सपाटीपासून ३६८० मीटर म्हणजे साधारण १४ हजार फुट उंचीवर आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्याची खोरी येथूनच सुरु होतात. हे मंदिर अति प्राचीन म्हणजे १ हजार वर्षापेक्षा जुने असल्याचे सांगितले जाते. केदारनाथ आणि बद्रीनाथ यांच्या साधारण मध्ये हे मंदिर असून ते पांडवांनी, त्यातही अर्जुनाने स्थापन केल्याचे मानले जाते. या मंदिरात शंकराचे हृदय असल्याचा विश्वास आहे.

गिर्यारोहक, पर्यटक आणि भाविक असे सर्वप्रकारचे प्रवासी येथे भेट देण्यास उत्सुक असतात. हिमालयाचे नैसर्गिक रौद्र तरीही सुंदर रूप येथे पाहायला मिळते. चारधाम यात्रेतील हेही एक महत्वाचे स्थान मानले जाते. मंदिराच्या दारात नंदी असून स्वयंभू शिवपिंड मंदिरात आहे.

उत्तर भारतीय शैली मधले बांधकाम असून आसपास अनेक देवतांची मंदिरे आहेत. त्यात काळभैरव, व्यास ,गणेश यांच्या मंदिरांचा समावेश आहे तसेच पांडव मंदिरही आहे. व्यास आणि काळभैरव यांच्या मूर्ती अष्टधातूच्या आहेत. थंडीत ही मंदिरे पूर्ण बर्फाखाली असतात आणि उन्हाळ्यात उघडतात. पण तेथे पायी जावे लागते.

असे सांगितले जाते की रामाने रावण वध केल्यावर काही काळ येथून जवळ असलेल्या चंद्रशिळा येथे तपस्या केली होती. राम शिवाची पूजा करत असे असेही मानले जाते.

Leave a Comment