या अब्जाधीशाने टेस्लाला टक्कर देण्यासाठी कारवर खर्च केले 4,616 कोटी

कार कंपनी टेस्लाला टक्कर देण्यासाठी ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेम्स डायसन यांनी इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी तब्बल 500 मिलियन पाउंड्स (जवळपास 4,616 कोटी रुपये) खर्च केल्याचा खुलासा केला आहे. जेम्स डायसन यांची एकूण संपत्ती 16.2 बिलियन पाउंड्स (जवळपास 1.5 लाख कोटी रुपये) आहे.

डायसन यांच्या कंपनीने कोडनेम असलेली इलेक्ट्रिक कार एन526 ला बाजारात आणण्याचा निर्णय घेतला होता. डायसन यांचा या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या निर्मितीचा उद्देश टेस्लाच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीला टक्कर देणे हा होता. मात्र नंतर हा प्रोजेक्ट रद्द करण्यात आला.

डायसन यांच्यानुसार, या 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्हीची रेंज 965 किमी होती.  टेस्ला मॉडलेच्या तुलनेत हा आकडा नक्कीच आकर्षक आहे. अ‍ॅलिम्युनियमपासून बनलेल्या या एसयूव्हीचे वजन 2.6 टन्स होते. तर याचा टॉप स्पीड ताशी 201 किमी होता व कार 0 ते 100 किमी अंतर केवळ 4.8 सेंकदात पार करू शकते. यात ट्विन 200kW इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आली होती, जी 536 बीएचपी पॉवर आणि 480 एलबी टॉर्क निर्माण करते.

डायसन यांनी सांगितले की, त्यांच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे डिझाईन बाजारातील कारपेक्षा एकदम वेगळे होते. मात्र हा प्रोजेक्ट त्यांना थांबवला. या मागचे कारण त्यांनी सांगितले की, याच्या निर्मितीसाठी मोठा खर्च येत होता व नफा खूप कमी होता. या प्रोजेक्टसाठी त्यांनी 500 मिलियन पाउंड्स खर्च केले. नफा मिळविण्यासाठी त्यांना प्रत्येक एसयूव्हीला 150,000 पाउंड्सला (जवळपास 1.37 कोटी रुपये) विकावे लागले असते.

Leave a Comment