सोशल मीडिया क्रश ठरलेल्या प्रिया वारिअरचा इन्स्टाग्रामला रामराम


साधारणतः दोन वर्षांपूर्वी एका गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक नवा चेहरा सर्वांच्या भेटीला आला होता. एका गाण्यातील अवघ्या काही सेकंदांसाठी दाखवलेल्या अदेमुळे ती एका रात्रीतच सोशल मीडिया क्रश झाली होती.

उरू अदार लव्ह या चित्रपटातील एका गाण्याची अवघ्या काही सेकंदांची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली. अभिनेत्री प्रिया वॉरियर ही ज्यामध्ये तिच्या नजरेने साऱ्यांना घायाळ करताना दिसली. प्रियाच्या नजरेचा बाण प्रेक्षकांवर असा काही चालला, की पाहता पाहता तिच्या सौंदर्याने घायाळ होणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढला. सोशल मीडिया अकाऊंटवर हा वाढता आकडा भल्याभल्यांना मागे टाकणारा होता.

सिनेसृष्टीत लोकप्रियता, प्रसिद्धी आणि एक वेगळे स्थान असे सर्वकाही सुरळीत सुरु असताना प्रियाने रविवारी तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याचे वृत्त समोर आले आणि सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरु झाली. कोट्यवधी चाहत्यांचे प्रेम मिळत असतानाही प्रियाने हा निर्णय का घेतला हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

मुख्य म्हणजे फक्त ‘उरू अदार लव्ह’ मधील एका गाण्यामुळेच नव्हे, तर त्यानंतरही प्रिया सातत्याने चर्चेचा विषय ठरली होती, ती म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. लाखो लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या प्रत्येक पोस्टवर होत होता, त्यामुळे आता तिचे या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात नसणे हे अनेकांसाठी निराशाजनक ठरणार आहे, असे म्हटले तर वावग ठरणार नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रियाने हे पाऊल सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे उचलल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान प्रिया दुसऱ्या एका माध्मातून तिच्या अदांनी अनेकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण, तिने काही दिवसांपूर्वीच टीक-टॉकवर पदार्पण करत एका नव्या विश्वात पाऊल ठेवले आहे. आता या नव्या प्लॅटफॉर्मवर तिला कसा प्रतिसाद मिळतो हे आगामी काळातच समोर येईल.

Leave a Comment