सलाम दोस्तीला! दिव्यांग मित्राला घरी पोहचविण्यासाठी केला 350 किमीचा पायी प्रवास

क्वारंटाईन सेंटरमध्ये मैत्री झालेल्या एका व्यक्तीने आपल्या दिव्यांग मित्राला तीनचाकी सायकलवर घरी सोडण्यासाठी तब्बल 350 किमीचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. पायाने दिव्यांग असलेले 40 वर्षीय गयूर अहमद हे मुजफ्फरनगरचे निवासी आहेत. राजस्थानच्या जोधपूर येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांची भेट 28 वर्षीय अनिरुद्ध झारे यांच्याशी झाली. अनिरुद्ध हे मुळचे नागपूरचे आहेत, मात्र फिरायला गेलेले अनिरुद्ध लॉकडाऊनमुळे राजस्थानमध्येच अडकले. दुसऱ्या ठिकाणांवरून आल्याने दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांची मैत्री झाली.

8 मे ला क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना एका बसमधून भरतपूरपासून 40 किमी अंतरावर उत्तर प्रदेश बॉर्डजवळ सोडण्यात आले. तेथून दोघेही वेगवेगळ्या दिशेने आपल्या घरी निघाले. मात्र दिव्यांग गयूर यांना तीनचाकी सायकलने घरी जाण्यास समस्या येत होती. त्यामुळे अनिरुद्ध यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला.

अनिरुद्ध पुढील 5 दिवस दिव्यांग गयूर यांच्या तीनचाकी सोबत चालत राहिले. या प्रवासात ते रस्त्यावरच झोपले, जे मिळेल ते खाल्ले. गयूर म्हणाले की, अनिरुद्ध 350 किमी पुर्ण प्रवासात माझ्यासोबत चालत होता. त्याने कधीच माझी साथ सोडली नाही. तर अनिरुद्ध म्हणाले की, सर्वात आधी आपण मनुष्य आहोत. त्यानंतर हिंदू-मुस्लिम. गयूर यांची मदत करायला मिळाल्याने मी आनंदी आहे. मी सध्या त्यांच्या कुटुंबासोबत आहे. सर्व लोक चांगले असून, हे आपल्या कुटुंबासोबत राहण्यासारखेच आहे. गयूरने अनिरुद्धला लॉकडाऊन संपेपर्यंत थांबून घेतले आहे. सोबतच मित्राला नागपूरपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाला विनंती केली.

Leave a Comment