लॉकडाउन 4.0 : चौथ्या टप्प्यात एका नवीन झोनची भर


नवी दिल्ली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने सुरक्षेच्या उपाययोजना आणखी कठोर केल्या असून देशभरातील वेगवेगळ्या भागांना आतापर्यंत रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये विभागण्यात आले होते. परंतु, यावेळी केंद्र सरकारकडून एक बफर झोन तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे. पण ही बफर झोन कोणत्या निकषावर ठरवण्यात येईल आणि कोणत्या झोनमध्ये काय सूट देण्यात आली आहे, त्याबाबतची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची विभागणी पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून त्यानुसार देशात आता रेड झोन, ग्रीन झोन, ऑरेंज झोन, कन्टेंन्मेंट झोन, बफर झोन अशी प्रकारे देशातील राज्यांची विभागणी होणार आहे.

आता आपल्यापैकी अनेकांना या नव्या झोनमध्ये नक्की काय येणार आणि हे कोण ठरवणार, असे प्रश्न पडले असतील. पण यासंदर्भात देशातील राज्यांना केंद्र सरकारने एक पत्र पाठवले असून त्यामध्ये झोनमध्ये करण्यात आलेल्या वर्गीकरणाबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे. देशातील राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्याचा अधिकार असणार आहे. तर कन्टेंन्मेंट आणि बफर झोनचा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार आहेत.

रेड आणि ऑरेंज झोन अंतर्गत कन्टेंन्मेंट, बफर झोन हे येतील. म्हणजेच, जिथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते, ते हे परिसर असणार आहेत. केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार हे स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कन्टेंन्मेंट झोनचा निर्णय घेण्यात येईल.

कन्टेंन्मेंट झोनमध्ये फक्त मेडिकल आणि घरगुती उपयोगाच्या सामांनांची दुकाने उघडणार आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील. या झोनला आरोग्य मंत्रालयाच्या गाइडलाइन्सचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. तसेच या झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येईल. परिसरातील सर्व रस्त्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. चौकशी केल्याशिवाय कोणालाही येण्या-जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही.

तर बफर झोनमध्ये कन्टेंन्मेंट झोनच्या आसपासचा परिसर असणार आहे. जिल्हा प्रशासन बफर झोनबाबत निर्णय घेणार आहे. बफर झोन असलेल्या परिसरात अधिकाधिक तपासण्या करण्यात येणार असून तेथील आरोग्य सुविधांवर जोर देण्यात येणार आहे. संशयित प्रकरणांची जिल्हा कंट्रोल रुमला माहिती देण्यात येणार असून या झोनमधील नागरिकांना फेस मास्क, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन कराणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर या झोनमध्ये स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यात येईल.

संसर्ग वाढण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना बफर झोनमध्ये करण्यात येतील. याव्यतिरिक्त केंद्राने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे अधिकार राज्यांकडे दिले असल्यामुळे राज्य सरकार परिस्थिती पाहून तेथील नियम कठोर किंवा शिथील करू शकणार आहे.

Leave a Comment