नवी दिल्ली – न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकने रिलायन्स जिओमध्ये ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा केली आहे. जनरल अटलांटिक याअंतर्गत जिओ प्लॅटफॉर्ममधील १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. आशियाई कंपनीतील जनरल अटलांटिकची आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक असून यासंदर्भातील माहिती कंपनीने रविवारी दिली.
रिलायन्स जिओमध्ये जनरल अटलांटिकची ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक
रिलायन्स जिओमध्ये गेल्या चार आठवड्यांमध्ये चार मोठ्या गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली आहे. रिलायन्स जिओमध्ये याद्वारे चार आठवड्यात ६७,१९४.७५ कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. रिलायन्स जिओमध्ये सर्वप्रथम फेसबुकने ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.
फेसबुकनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकने ५,६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केल्यानंतर जिओमधील २.३२ टक्के हिस्सा विस्टा इक्विटी पार्टनर्सने खरेदी केला होता. त्यांनी याअंतर्गत कंपनीत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य ४.९१ लाख कोटी रूपये आणि एन्टरप्राईझेस व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रूपये झाल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देण्यात आली. आतापर्यंत करण्यात आलेल्या या चार गुंतवणुकीतून कंपनीचा १४.८ टक्के हिस्सा विकण्यात आला आहे.
दरम्यान रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ग्लोबल इंडिस्ट्रिजचे व्हॅल्यू पार्टनर म्हणून मी स्वागत करतो. जनरल अटलांटिकला भारतावर विश्वास आहे. त्याचबरोबर त्यांचा आमच्या डिजिटल व्हिजनशीदेखील विश्वास आहे. यासाठी त्यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुतवणूक केल्याची माहिती दिली.