अखेर आमदार झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, घेतली सदस्यत्वाची शपथ


मुंबई : कोरोनासोबतच राज्यातील राजकीय वातावरण विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे तापले होते ते आता निवडणुकीनंतर शांत झाले आहे. त्यातच आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेचे आमदार बनले आहेत. आज मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत यावेळी पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे हे आमदार म्हणून शपथ घेणारे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार बनले. शिवाय ते कॅबिनेट मंत्रीही बनले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासह आमदारकीची महाविकास आघाडीतील नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड या नेत्यांनी शपथ घेतली. तर भाजपकडून गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके रमेश कराड आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथग्रहण केली. भाजपचे गोपीचंद पडळकर हे शपथविधीसाठी धनगरी वेशात आले होते. सर्व सदस्यांना विधानपरिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आमदारकीची शपथ दिली. शपथविधीची प्रक्रिया अवघ्या 10 मिनिटात पार पडली. या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय अस्थिरताही संपली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत अखेरच्या दिवशी 13 पैकी 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. 13 उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भाजप), संदीप सुरेश लेले (भाजपक्ष), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस) या चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

Leave a Comment