भज्जीची सटकली…! म्हणाला त्या आफ्रिदीची तर एैशी की तैशी


जगभरातील बहुसंख्य देश कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने मात्र यानिमित्त भारताच्या विरोधात गरळ ओकण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. काश्मीर मुद्द्यावरून भारतीय व्यवस्था आणि पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. शाहिद आफ्रिदी याने काश्मीरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नसल्याचे म्हणत काश्मीर वाचावायला हवे (#SaveKashmir) अशा आशयाचे ट्विट केले. त्याचबरोबर आफ्रिदीने एका ठिकाणी बोलताना, भारताचे पंतप्रधान मोदी हे केवळ धर्माचे राजकारण करतात. आतापर्यंत काश्मीरमधील जनतेला दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावे लागेल, असे देखील त्यान म्हटले आहे. यावरून भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने आता आफ्रिदी आणि माझा काहीही संबंध नसल्याचे म्हणत त्याला चांगलेच झापले आहे.

माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल शाहिद आफ्रिदी जे काही बोलला, ते चुकीचे असून अशा गोष्टी मी तरी खपवून घेणार नाही. कोरोनाबाबतच्या आफ्रिदीच्या उपक्रमाला आम्ही मदतीचे आवाहन करावे असे त्याने स्वत: आम्हाला सांगितले म्हणून आम्ही त्याच्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. माणुसकीच्या नात्याने आम्ही त्याच्या उपक्रमाला मदत केली आणि तो कोरोनाबाधितांची मदत करत होता. कारण आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की धर्म, जात किंवा सीमेच्याही पलीकडचा कोरोनाविरूद्धचा हा लढा असल्यामुळे आमच्या डोक्यात स्पष्ट होते की ही मदत आम्ही कोरोनाबाधितांसाठी करत आहोत. पण तोच माणूस आमच्याच देशाबद्दल आता वाईट बोलतो आहे. त्या आफ्रिदीची तर एैशी की तैशी.. भारताविरोधात बोलायचा त्याला काहीही अधिकार नाही. त्याच्या देशात आणि मर्यादेत त्याने राहावे, अशा स्पष्ट शब्दात हरभजनने स्पोर्ट्स तक कार्यक्रमात आपला राग व्यक्त केला.

मी माझ्या देशाचे २० वर्ष प्रतिनिधीत्व केले आहे. माझा जन्म भारतात झाला आहे आणि शेवट देखील भारतातच होईल. त्यामुळे माझ्या देशाविरोधात कोणालाही काही बोलायचा अधिकार नाही. देवा ना करो… पण जर कधी काळी देशाला माझी गरज वाटली, तर देशासाठी बंदूक घेऊन सीमेवर जाण्याची तयारी करणारा मी पहिला असेन, असेही हरभजन म्हणाला.

Leave a Comment