मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2010 साली ग्वालियरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले वहिले दुहेरी शतक ठोकत इतिहास रचला होता. सचिनने हे दुहेरी शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले होते. या सामन्यात त्याने 147 चेंडेमध्ये 25 चौकार आणि 3 षटकारांच्या साहय्याने नाबाद 200 धावा केल्या होत्या. सचिनच्या या पारीविषयी आता दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने मोठा खुलासा केला आहे.
पंचांच्या एका चुकीमुळे सचिनचे द्विशतक झाले, स्टेनचा धक्कादायक खुलासा
स्टेननुसार, दुहेरी शतक ठोकण्याआधी सचिन त्याच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. सचिन 190 धावांवर खेळत असताना एलबीडब्ल्यू झाला होता. मात्र अंपायरने बाद दिले नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसोबत स्काय स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना त्याने हा खुलासा केला.
स्टेन म्हणाला की, या सामन्यात इयान गोल्ड अंपायर होते. त्यांनीच सचिनला नॉट आउट दिले होते. याविषयी जेव्हा मी इयान गोल्ड यांना नॉट आउटविषयी विचारले तेव्हा त्यांनी मस्करीमध्ये म्हटले होते की, चारही बाजूला बघ मित्रा, जर मी आउट दिले तर हॉटेलमध्ये परत कसा जाऊ शकेल.
या सामन्यात भारतीय संघाने सचिनच्या दुहेरी शतकाच्या जोरावर 3 बाद 401 धावा केल्या होत्या. तर धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 248 धावा करू शकला होता.