नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची सविस्तर माहिती देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत आहेत. निर्मला सीतारामन यांनी यावेळी स्थलांतरित मजूर आणि शेती क्षेत्रासंबंधी केलेल्या घोषणांवर बोलताना विप्रोचे अध्यक्ष आणि संस्थापक अझीम प्रेमजी यांनी मनरेगाचा विस्तार करण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा असल्याचे इकोनॉमिक्स टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांना गरीब कुटुंबाना तात्काळ मदत करण्याचा सल्लाही यावेळी दिला आहे. कोरोनाविरोधातील लढाईसाठी अझीम प्रेमजी यांनी ११२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अझीम प्रेमजी यांचा मोदी सरकारला गरीब कुटुंबाना तात्काळ मदत करण्याचा सल्ला
केंद्र सरकारने मनरेगाचा विस्तार करण्याचा जो निर्णय घेतला आहे, ते सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचबरोबर साडे तीन महिन्यांसाठी रेशन सुविधा सार्वत्रिक आणि दुप्पट करण्याची गरज असून सरकारच्या माध्यमातून दारोदारी जाऊन धान्य वाटप केले गेले पाहिजे. धान्यासोबत तेल, डाळी, मीठ, मसाला, सॅनिटरी पॅड यांचेदेखील अतिरिक्त वाटप केले पाहिजे, असे आपल्या लेखात अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, ग्रामीण विभागासाठी तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने प्रत्येक गरीब कुटुंब किंवा स्थलांतरित मजुरांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची गरज असून, पुढील तीन महिन्यांसाठी सात हजार रुपयांची मदत केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
अझीम प्रेमजी यांनी स्थलांतरित मजुरांसंबंधी बोलताना विनाकारण होणारे मृत्यू अक्षम्य शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. कामगार कायदे रद्द करणे अनेक राज्य सरकारांनी आपल्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अडकलेल्या तसेच स्थलांतरित मजुरांना प्रवास करण्यासाठी संपूर्ण स्वायत्तता आणि स्वातंत्र्य दिले पाहिजे असे सांगताना कोरोनाचा फैलाव होणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे असे देखील अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे. कोणावरही थांबण्यासाठी किंवा पुन्हा त्यांच्या राज्यात जाण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ नये. ट्रेन किंवा बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी स्थलांतरित मजुरांना परवानगी दिली पाहिजे, असे अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे.