एक झलक दाखवून किम जोंग उन पुन्हा गायब

फोटो साभार डेली एक्सप्रेस

सर्जरी मध्ये मृत्यू झाला तेथपासून करोना भीतीमुळे तो अज्ञात स्थळी मुक्कामाला गेला अश्या अनेक बातम्या उ. कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्या संदर्भात वारंवार प्रसिद्ध केल्या जात आहेत. गेले अनेक दिवस तो कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमात न दिसल्याने अश्या अफवा उठत होत्या पण २ मे रोजी एका खत कारखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला किमचे दर्शन झाले आणि हा खरा किम का त्याचा डुप्लिकेट अश्या चर्चा सुरु झाल्या. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा १५ दिवस झाले तरी किमचे दर्शन घडलेले नाही. यामुळे पुन्हा एकदा किम विषयी उलट सुलट बातम्या दिल्या जात आहेत.

सॅटेलाईट फोटो इमेजने किमच्या मालकीच्या अलिशान नावेचे फोटो टिपले असून किम या नावेतून त्याच्या गुप्त ठिकाणी म्हणजे वॉन्सान येथे परतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एप्रिल पासून ते मेच्या पहिल्या आठवड्यात किमच्या वॉन्सान व्हिला बाहेर १९७ फुटी लांबीची एक नाव सॅटेलाईट इमेज मध्ये दिसते आहे. त्यामुळे किम तेथे पोहोचला असावा किंवा त्याच्या तेथे येण्याची तयारी केली जात असावी असे अंदाज बांधले जात आहेत.

किमच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख व चीफ सुरक्षा हेड याना अचानक नोकरीवरून काढून टाकले गेले आहे. किमचे बॉडीगार्ड बदलले गेले आहेत. हि कारवाई का केली गेली याची कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही. उ. कोरिया मध्ये अनेक गोष्टी कधीच उघड होत नाहीत. किमची बहिण किम योंग जोंग हिच्यावर त्यामुळे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तिला किमची उत्तराधिकारी मानले जाते त्यामुळे किमच्या अनुपस्थितीत तिला कोणते पद दिले जाते यावर जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Leave a Comment