अमेझॉनचे जेफ बेजोस बनणार पहिले ट्रिलेनियर

फोटो साभार पिंटरेस्ट

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे मालक जेफ बेजोस हे आणखी ६ वर्षांनी म्हणजे २०२६ मध्ये जगातील पहिले ट्रिलेनियर बनतील असा अंदाज सल्लागार फर्म कंपॅरिझनच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत बेजोस यांची संपत्ती सध्या १४३ अब्ज डॉलर्स आहे. सहा वर्षात ती १ ट्रीलीयन म्हणजे १ हजार अब्ज डॉलर्स होईल. सध्या बेजोस ५६ वर्षाचे असून वयाच्या ६२ व्या वर्षी ते जगातील पहिले ट्रिलेनियर बनतील असे या अहवालात म्हटले गेले आहे. हा रिपोर्ट तयार करताना  फोर्ब्स यादीतील २५ टॉप व्यक्ती व न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंज लिस्टेड मोस्ट व्हॅल्युड कंपन्या यांचा आधार घेण्यात आला आहे.

गेल्या पाच वर्षात या कंपन्यांची वाढ कशी आणि किती वेगाने झाली हे लक्षात घेऊन ही यादी बनविली गेल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक सध्या कोविड १९ मुळे उद्योग व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र अमेझॉनच्या व्यवसायात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

या रिपोर्ट नुसार जगाला दुसरा ट्रिलेनियर २०२७ साली शु जियामीनच्या रुपाने मिळेल. तिसरा ट्रिलेनियर अलीबाबाचे जॅक मा २०३० मध्ये होतील आणि त्यावेळी ते ६५ वर्षाचे असतील. आशियातील सर्वाधिक श्रीमंत आणि रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी वयाच्या ७५ व्या वर्षात म्हणजे २०३३ मध्ये ट्रिलेनियर बनतील असेही यात म्हटले गेले आहे. या यादीसाठी ज्या २५ व्यक्तीचे विश्लेषण केले गेले त्यातील ११ च त्यांच्या जीवनकाळात ट्रिलेनियर बनतील असे सूचित केले गेले आहे.

फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग त्याच्या ५१ व्या वर्षी म्हणजे आणखी १० वर्षांनी ट्रिलेनियर यादीत असेल असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.

Leave a Comment